Skip to content Skip to footer

शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा भाजपचा सुनियोजित कट – नवाब मलिक

शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा भाजपचा सुनियोजित कट – नवाब मलिक

केंद्रीय कृषी कायद्याविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून, मंगळवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारावरून आता राजकीय वातावरण तापू लागले आहेत. त्यात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिल्लीतील हिंसाचारामागे भारतीय जनता पक्षाचा हात असल्याचा आरोप केला आहे. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

लाल किल्ल्याच्या दिशेने ट्रॅक्टर रॅली गेली होती. पोलिसांनीच त्यांना लाल किल्ल्याचा मार्ग दाखवला. भाजपशी संबंधित दीप सिद्धूने तिथे ध्वज फडकवण्याचे काम केले. याच दीप सिद्धूने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. दिल्लीत उसळलेला हिंसाचार हा शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा भाजपचा सुनियोजित कट होता, असा आरोप नवाब मलिक यांनी यावेळी बोलताना केला.

केंद्रीय कृषी कायद्याविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या विविध सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. ट्रॅक्टर रॅली काढणार असल्याचे यापूर्वीच शेतकऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले होते. ट्रॅक्टर रॅली दिल्लीत आली आणि लाल किल्ल्यावर पोहोचली. आंदोलक शेतकऱ्यांनी तिरंगा ध्वज काढून आपला ध्वज फडकवला, ही बातमी चुकीची आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

Leave a comment

0.0/5