Skip to content Skip to footer

काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, जाणून घ्या…

महाराष्ट्र बुलेटिन : नुकतेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची घोषणा दिल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच चिघळले असून महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षांचे सूर काही जुळत नसल्याची चर्चा सध्या सर्वत्र होताना दिसत आहे. नाना पटोले यांनी लोणावळ्यात झालेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये असे वक्तव्य केले की मुख्यमंत्री व गृहमंत्री आपल्यावर पाळत ठेवत असून राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे. त्यांच्या या आरोपांमुळे राज्यभर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान नाना पटोलेंच्या स्वबळाच्या घोषणेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली असून नाना पटोले यांना टोला लगावला आहे. जलसंवर्धनाच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांचा जलभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला असून यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “बाळासाहेब थोरात यांनी कोरोनाची भीती न बाळगता आम्हाला जेवण्यासाठी बोलवावं, आम्ही तुमच्याकडे येऊन स्वबळावर जेऊ,” असा टोला लगावला आहे.

तसेच पुढे ते म्हणाले की, “चुकीचा अर्थ काढू नका, नाहीतर उद्या जेवणावरुन आघाडीत बिघाडी असं व्हायचं, पण तसं काही नाही,” असे मिश्कील भाष्यही यावेळी त्यांनी केले. तसेच ते म्हणाले की, “आतापर्यंतची माझी राजकीय कारकीर्द ही काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विरोधामधील राहिली आहे. जे काही कानावर पडलं ते राजकीय मतभिन्नतेचं पडलं होतं. मात्र विरोधक होतो म्हणून तुम्ही केलं ते सगळं वाईटच असा याचा अर्थ होत नाही. शिवसेना प्रमुखांची आणि शिवसेनेची अशी भूमिका कधीच नव्हती,” असे देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मीच लोकप्रिय… असा गैरसमज कोणाचाही होऊ नये

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, “कोणीतरी माझा लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला. सध्या तशी पद्धतच पडली आहे. पण असा कोणाचाही गैरसमज होता कामा नये की, मीच लोकप्रिय आहे. सर्वजण जीव तोडून काम करत मुख्यमंत्र्यांना लोकप्रिय करत असतात. मुख्यमंत्री लोकप्रिय म्हणजे सरकार लोकप्रिय आहे आणि याचाच अर्थ म्हणजे मंत्रिमंडळ योग्यरीत्या काम करत आहे. सरकार म्हणजे केवळ मंत्री नाहीत तर त्यामध्ये सचिव, अभियंता हे देखील आले,” असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.

Leave a comment

0.0/5