Skip to content Skip to footer

शिवसेना नेते संजय राऊतांनी साधला निशाणा, म्हणाले- ‘केंद्र सरकारच बरखास्त केलं पाहिजे’

महाराष्ट्र बुलेटिन : राज्यात सध्या राजकीय घडामोडींनी वातावरण तापलेल्या अवस्थेत आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून बदली केलेल्या परमवीर सिंग यांच्या पत्रानंतर राज्यातील विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरले असून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या दरम्यानच आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी देखील विरोधी पक्षांनी लावून धरली आहे. दरम्यान या प्रश्नांना उत्तर देताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याऐवजी केंद्र सरकारच बरखास्त केलं पाहिजे,” दरम्यान संजय राऊतांना प्रश्न विचारण्यात आला की, गृहमंत्री अनिल देशमुख हे मंत्रिपदावर असताना निष्पक्ष चौकशी होऊ शकते का? या प्रश्नावर राऊत म्हणाले की, “जोपर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत कुठल्याही दबावाशिवाय आणि निष्पक्षपणे चौकशी होईल. विरोधकांच्या बिनबुडाच्या आरोपामुळे राज्य सरकारच्या प्रतिमेला तडा जाणार नाही. राज्याच्या जनतेला हे समजले आहे की विरोधाचं राजकारण करून केंद्राच्या तपास यंत्रणांना महाराष्ट्रात घुसवायचं आणि त्या तपास यंत्रणांच्या माध्यमातून माहोल तयार करायचा. केंद्रीय तपास यंत्रणा ढगातून पडलेल्या आहेत का? असा प्रश्न देखील यावेळी संजय राऊतांनी उपस्थित केला.

या प्रकरणावर प्रकाश आंबेडकरांनी देखील राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी केली होती. याबाबतीत ते राज्यपालांची भेट घेणार असल्याचे समजले यावर राऊतांना प्रश्न विचारला असता खासदार संजय राऊत म्हणाले की, “प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. बाबासाहेब हे घटनाकार आहेत. त्यांच्याविषयी आमच्या मनात किती श्रद्धा आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. जर प्रकाश आंबेडकर सांगत असतील की राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, तर त्यांनी घटनेचा पुन्हा एकदा अभ्यास करावा. कारण खोटी-नाटी प्रकरणं निर्माण करून विरोधी पक्ष ज्या प्रकारे महाराष्ट्र सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय, त्यानुसार राष्ट्रपती राजवट लागू शकत नाही किंबहुना केंद्र सरकारच बरखास्त केलं पाहिजे. कारण हा राज्याच्या स्वायत्तेवर घाला आहे. असे राऊत यांनी स्पष्ट केले.

Leave a comment

0.0/5