Skip to content Skip to footer

झुंजार! दुखापतीनंतरही जाडेजानं कांगांरुंची केली धुलाई

पुन्हा एकदा जाडेजानं भारतीय संघाचा डाव सावरला

पहिल्या टी-२० सामन्यात सलामीवीर लोकेश राहुल (५१) आणि रविंद्र जाडेजा (४४) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारतीय संघानं निर्धारित २० षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात १६१ धावांपर्यंत मजल मारली आहे. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवर अंकुश ठेवत त्यांना मोठे फटके खेळण्याची संधीच दिली नाही. परंतू जाडेजाने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत भारतीय संघाला आश्वासक धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला. जाडेजानं अवघ्या २३ चेंडूत ४४ धावा चोपल्या. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतासाठी तारणहार ठरलेला जाडेजा पहिल्या टी-२० सामन्यातही धावून आला. बिकट अवस्थेत असणाऱ्या भारतीय संघाला सन्माजनक धावसंख्या उभारुन दिली.

हार्दिक पांड्या बाद झाल्यानंतर सर्व जबाबदारी जाडेजावर होती. त्यातच १९ व्या षटकात फलंदाजी करत जाडेजाच्या मांडीचा स्नायू दुखावला गेला. जाडेजाला धावताही येत नव्हतं. मात्र भारतीय संघाला धावांची गरज होती. परिस्थिती बदलण्यासाठी दुखापतग्रस्त जाडेजानं उपचार घेत झुंजार खेळी केली. जाडेजानं अखेरच्या दोन षटकांत ३५ पेक्षा जास्त धावा वसूल केल्या. जाडेजानं आपल्या तुफानी फलंदाजीमध्ये पाच चौकार आणि एक षटकार लगावला. जाडेजाच्या खेळीचं वैशिष्ट्य म्हणजे… एका धावचं त्यानं दोन धावांमध्ये रुपांतर करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजावर दबाव टाकला.

टी-२० क्रिकेटमधली सर्वोत्तम कामगिरी –
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ४४ धावा ही जाडेजाची सर्वोत्म कामगिरी आहे. जाडेजाने या खेळीसह धोनीचा विक्रमही मोडला आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सातव्या क्रमांकावर फलंदाजी करत असताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता जाडेजाच्या नावावर जमा झाला आहे.

Leave a comment

0.0/5