Skip to content Skip to footer

‘आयपीएल’चे १४वे पर्व ११ एप्रिलपासून?

इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) १४वे पर्व ११ एप्रिलपासून सुरू होण्याची दाट शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि ‘आयपीएल’ प्रशासकीय समिती यांच्यात या मोसमातील ‘आयपीएल’च्या वेळापत्रकाविषयी एकमत झाले आहे. त्यानुसार, ‘आयपीएल’ला ११ एप्रिलपासून सुरुवात होईल आणि अंतिम सामना ५ किंवा ६ जून रोजी खेळवण्यात येईल, असे ‘बीसीसीआय’मधील सूत्रांनी सांगितले.

‘‘याविषयीचा अंतिम निर्णय ‘आयपीएल’ प्रशासकीय समितीच्या बैठकीत घेण्यात येणार आहे. मात्र पर्यायी तारीख म्हणून ११ एप्रिलची निवड करण्यात आली आहे. भारतीय संघाची इंग्लंडविरुद्धची मालिका मार्च महिन्यात संपुष्टात येणार असून तोपर्यंत खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळू शकेल,’’ असेही या पदाधिकाऱ्याने सांगितले.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिका २८ मार्च रोजी संपणार आहे. त्यानंतर पुरेशी विश्रांती घेऊन सर्व खेळाडू आपापल्या संघात दाखल होतील. ‘‘यंदाची आयपीएल भारतातच खेळवण्यात येणार आहे. भारतातील करोनाबाबतची परिस्थिती दिवसेंदिवस सुधारत आहे. त्यामुळे ‘बीसीसीआय’ला पुढील आयपीएलसाठी परदेशातील ठिकाणाची व्यवस्था करावी लागणार नाही,’’ असे ‘बीसीसीआय’चे खजिनदार अरुण धुमाळ यांनी शनिवारी स्पष्ट केले होते.

‘आयपीएल’चे १३वे पर्व करोनामुळे संयुक्त अरब अमिरातीत खेळवण्यात आले होते. मात्र यंदाची ‘आयपीएल’ मायदेशातच खेळवण्यात येणार असल्याचे प्रशासकीय समितीचे सदस्य असलेले धुमाळ म्हणाले. ‘‘सद्यस्थितीत अमिरातीपेक्षा भारत हे सुरक्षित ठिकाण आहे. करोनाबाबतच्या परिस्थितीत सुधारणा होईल, अशी आशा आहे. आयोजनासाठी अद्याप आमच्याकडे पुरेसा वेळ असल्याने योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात येतील,’’ असेही धुमाळ म्हणाले.

Leave a comment

0.0/5