Skip to content Skip to footer

शिवरायांची जगदंब तलवार परत न करणाऱ्या इंग्लंडच्या क्रिकेट संघाला महाराष्ट्रात खेळू देणार नाही : शिवसेना

छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार भारताला परत न देणाऱ्या इंग्लंडच्या क्रिकेट संघाला महाराष्ट्राच्या भूमीवर क्रिकेट खेळू देणार नाही अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. कोल्हापूरमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून चालवल्या जाणाऱ्या शिवदुर्ग संवर्धन आंदोलन समितीने छत्रपतींच्या घराण्याची जगदंब तलवार परत द्यावी या मागणीकडे भारत सरकारबरोबरच, इंग्लंडचे सरकार आणि इंग्लडच्या राणीचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आज कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भातील माहिती देण्यात आली.

शिवछत्रपतींच्या अनेक तलवारींपैकी करवीर छत्रपती घराण्याकडे असणारी एक जगदंबा नवाची तलवार आज इंग्लडच्या राणीच्या व्यक्तिगत संग्रहात असणाऱ्या ‘रॉयल कलेक्शन ट्रस्ट’मध्ये सेंट जेम्स पॅलेस येथे ठेवण्यात आली आहे. ही तलवार कोल्हापूर छत्रपतींच्या गादीवर छत्रपती महाराज (चौथे) हे अल्पवयीन (११ वर्षांचे) असताना इंग्लंडचा तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स (सातवा एडवर्ड) हा भारत भेटीवर आला असता सन १८७५-७६ मध्ये त्यांना जबरदस्तीने भेट म्हणून दिली होती. ही इंग्लंड येथे असणारी जगदंबा तलवार भारतात परत यावी अशी तमाम शिवभक्तांची भावना आहे, असं कोल्हापूरमधील शिवसेनिकांनी म्हटलं आहे.

ही तलवार परत आणण्यासांदर्भात अनेक नेत्यांनी या पूर्वी भाष्य केल्याची आठवणही या शिवप्रेमींनी करुन दिली आहे. या आगोदर ही यशवंतराव चव्हाण, बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्यापासून ते कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भारताचे पंरतप्रधान नरेंद्र मोदींनीही आम्ही ही तलवार भारतात परत आणू अशी घोषणा केली होती. पण अजूनपर्यंत यासंदर्भात काहीच सकारात्मक निर्णय घेण्यात आला नाही. तमाम शिवभक्तांच्या भावना या तलवारीशी निगडीत आहेत ती सन १८७५-७६ मध्ये इंग्लंडच्या प्रिन्सने घेतलेली तलवार भारतात परत आणण्यासाठी काही प्रयत्न झालेले नाहीत, अशी खंत या शिवप्रेमींनी व्यक्त केलीय.

आम्ही जगदंबा तलवार भारताला परत द्यावी यासाठी इंग्लडच्या राणीचे आणि सरकारचे लक्ष वेधण्याच्या उद्देशाने भारतात आलेल्या इंग्लंड देशाच्या क्रिकेट संघाला महाराष्ट्राच्या भूमीत क्रिकेट खेळण्यास विरोध करणार आहोत. हा विरोध दर्शवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करणार आहोत, असं शिवसैनिकांनी म्हटलं आहे.

Leave a comment

0.0/5