Skip to content Skip to footer

महाराष्ट्राचे वातावरण बिघडविणाऱ्या टोळधाडी कोणत्याही थराला, पण उद्धव ठाकरेंना ११ कोटी जनतेचा आशीर्वाद – शिवसेना

महाराष्ट्रातील साधू हत्येचे मारेकरी फासावर जातील. मात्र इतर राज्यांत भूकबळी व त्यातून जे झुंडबळी जात आहेत त्यावर काय ते बोला! अशावेळी तुमचे घसे बसतात व डोळे तिरळे होतात. ही पत्रकारिता समाजविरोधी आहे अशी टीका शिवसेनेने सामना संपादकीयमधून केली आहे. महाराष्ट्राचे वातावरण बिघडविणाऱया टोळधाडी कोणत्याही थराला जातील हे आता स्पष्ट झाले आहे. या टोळधाडींना ज्या कुणाचा आशीर्वाद असेल तो असू द्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 11 कोटी जनतेचा आशीर्वाद आहे. हे आशीर्वाद म्हणजे तुमच्या रेकण्यातून निर्माण झालेली फेक न्यूज नाही. फेक न्यूजवाल्यांवरील हल्लेही फेकच ठरतात. सरकारला बदनाम करण्यासाठी सुरू झालेले हे फेकतंत्र त्यांच्यावरच उलटेल असं शिवसेनेने म्हटलं आहे.

मॉब लिंचींग म्हणजे झुंडबळी कोठे होतील याचा काही भरवसा राहिलेला नाही. उत्तर प्रदेशातील घटना महाराष्ट्रातील डहाणूपेक्षाही हृदयद्रावक आहे. अन्नासाठी घराबाहेर पडलेल्या गरीबाला जमावाने ठेचून ठेचून मारले आहे. पोलीस त्या गरीबाचा जीव वाचवायला गेले तर त्या पोलिसांनाही मारहाण झाली. लॉकडाऊनमध्ये घरी भूकेने व्याकुळ झालेला हा अभागी जीव घराबाहेर पडला व लोकांनी त्याला चोर समजून ठार केले. महाराष्ट्रात दोन साधूंसह तिघांची हत्या जमावाच्या झुंडगिरीने केली. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी महाराज यांनी चिंता व्यक्त केली होती.

ती योग्यच आहे. समाजात बेरोजगारी आणि भविष्यातील चिंतेने भावनांचा उद्रेक होत आहे. त्यातून हिंसा वाढते आहे. भविष्याच्या पोटात काय दडले आहे त्याचे हे विदारक चित्र आहे. पालघरमधील साधूंची हत्या हा माणुसकीला कलंक आहे. त्याचे राजकारण कोणी करू नये, पण भक्तमंडळी सध्या रिकामटेकडी बसली आहेत व कोरोना युद्धाच्या धुरावर स्वत:च्या भाकऱया शेकवीत आहेत

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसारख्या राज्यांत लॉकडाऊनमुळे भूकबळी व त्यातून झुंडबळी सुरू झाले. यावर एखादे चॅनल त्याचे ते डिबेट की काय ते का करत नाही व भक्त मंडळही तोंडाचे लॉकडाऊनकरून गप्प का बसले आहेत? अशी विचारणा शिवसेनेने केली आहे.

केंद्र सरकारला काल समोर येऊन सांगावे लागले की, कोरोनाशी लढा देणाऱया फौजांत डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेवक आहेत. त्यांच्यावर हल्ले करणाऱयांना सात वर्षे कारावास होईल. सध्याच्या काळात डॉक्टर हेच देवदूत ठरत आहेत. या देवदूतांवर निदान महाराष्ट्रात तरी अ लीकडे हल्ला झाल्याचे उदाहरण नाही. इंदूरमध्ये डॉक्टरांना बेदम मारले. बिहारच्या दरभंगामध्ये डॉक्टरांना मारले. कोरोना वायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णाला घेऊन जाण्यास आलेल्या डॉक्टरांच्या टीमवर प्राणघातक हल्ला झाला.

डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांवरही त्याच निर्घृण पद्धतीने हल्ले झाले. उत्तर प्रदेशातील मेरठमध्येही डॉक्टरांना का मारले? रुग्णांवर उपचार करणाऱया डॉक्टरांनाही कोरोनाचा संसर्ग झाला या अंधश्रद्धेतून लोकांनी डॉक्टरांना वाईट पद्धतीने मारले. यात बळी गेले नाहीत हे सुदैव, पण ही डहाणूतील साधू हत्येइतकीच झुंडगिरी आहे असं शिवसेनेने म्हटलं आहे.

महाराष्ट्राकडे वाकडय़ा नजरेने जे पाहात आहेत त्यांचे डोळे बहुधा तिरळे झाले आहेत. त्यांना स्वराज्यातील ही झुंडगिरी दिसत नाही. डहाणूतील साधूहत्येने महाराष्ट्राच्या इभ्रतीस धक्का पोहोचला हे खरेच, पण ज्या राज्यात गरीब अन्नासाठी बाहेर पडतो, डॉक्टर सेवेसाठी बाहेर पडतो आणि त्यांना मारहाण होते अशावेळी त्या राज्याची इभ्रत वाढते काय? तसे जर कोणाला वाटत असेल तर काय बोलावे? असे सवाल शिवसेनेने विचारले आहेत.
महाराष्ट्रात साधूंच्या हत्येनंतर चोवीस तासात कारवाई झाली व झुंडीत सामील झालेल्या शंभरावर आरोपींना अटक झाली हे महत्त्वाचे. साधू मारले गेले आहेत म्हणून कारवाईची गरज नाही, असे सोनिया गांधी किंवा अन्य कुणी सांगितले नाही. एखाद्या पाद्रय़ाची, एखाद्या मौलवीची अशाप्रकारे हत्या महाराष्ट्रात झाली असती तर काँग्रेस किंवा सोनिया गांधी गप्प बसल्या असत्या काय? असे प्रश्न विचारून एखादा रेकणारा पत्रकार धार्मिक तेढ निर्माण करणार असेल तर मोदी सरकारने अशा चॅनलची मान्यता रद्द केली पाहिजे अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
देशात काय संकट सुरू आहे आणि हे रेकणारे काय बोंबलत आहेत? महाराष्ट्रातील साधू हत्येचे मारेकरी फासावर जातील. यासाठी महाराष्ट्राचे पोलीस समर्थ आहेत. इतर राज्यांत भूकबळी व त्यातून जे झुंडबळी जात आहेत त्यावर काय ते बोला! अशावेळी तुमचे घसे बसतात व डोळे तिरळे होतात. ही पत्रकारिता समाजविरोधी आहे. या गंभीर स्थितीतही पत्रकार एखाद्या राजकीय समूहाचे बाहुले बनून स्वत:ची आपटत राहतात, विष पसरवतात व अशा विषारी प्रवाहात भगतगण रंगपंचमी खेळतात. यावर रामबाण उपाय शोधावाच लागेल असं शिवसेनेने म्हटलं आहे.

Leave a comment

0.0/5