भारतीय जनता पक्षाच्या जळगाव ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षा अस्मिता पाटील यांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. एकनाथ खडसेंपाठोपाठ त्या घड्याळ हाती बांधणार, म्हणजेच घरवापसी करणार, की शिवसेना पक्षात प्रवेश करणार, याची उत्सुकता वाढली आहे.
प्रा. डॉ. अस्मिता पाटील या जळगाव भाजपच्या ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षा आणि बेटी बचाव बेटी पढाव अभियानाच्या राज्य सदस्या होत्या. त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती त्यांनी प्रसार मद्यमांना दिली. ‘मी अस्मिता नित्यानंद पाटील वैयक्तिक कारणास्तव भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे’ असे पत्र अस्मिता पाटील यांनी जळगाव ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सुरेश भोळे यांना लिहिले आहे.
अस्मिता पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी राष्ट्रवादीसोबत काही वर्ष काम केलं आहे. नुकतंच राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी अन्य पक्षात गेलेल्या नेत्यांना घरवापसीची साद घातली होती, तिला प्रतिसाद देत अस्मिता पाटील राष्ट्रवादीत स्वगृही परतणार का हा सवाल उपस्थित केला जात आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम केल्यावर भाजपची खानदेशातील गळती वाढली आहे. त्यामुळे खडसेंच्या पावलावर त्या पाऊल टाकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.