Skip to content Skip to footer

नवी मुंबईतील विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करा -मुख्यमंत्री

घणसोली, ऐरोली उर्वरित रस्त्यावर खाडीपूल बांधण्याबाबतच्या प्रकल्पाचा आढावा बैठकीत घेण्यात आला

नवी मुंबईतील पाम बीच ट्रॅक, ज्वेल ऑफ नवी मुंबई, गवळी देव वन पर्यटन प्रकल्प, ऐरोलीतील मैदान यांसारखे प्रकल्प सिडको आणि महापालिकेने समन्वयातून लवकरात लवकर पूर्ण करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

नवी मुंबईतील विकासकामांबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी गुरुवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीस नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांच्यासह संबं मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव आशीष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. राजीव, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर आदी उपस्थित होते.

नवी मुंबईतील घणसोली येथे राखीव भूखंडावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल (स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स) बांधण्याबाबत या वेळी चर्चा करण्यात आली. या संदर्भातील तांत्रिक बाजू पूर्ण करून नवी मुंबई महापालिकेने सिडकोकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

नवी मुंबईला जोडणारा आणि ठाणे-बेलापूर रस्त्याला पर्यायी ठरणारा, किनारपट्टी रस्त्याला (कोस्टल रोड) जोडणाऱ्या प्रकल्पाच्या कामाबाबत या वेळी चर्चा झाली. नवी मुंबई विमानतळ आणि इतर शहरांना जोडणारा कोस्टल रोड हा प्रकल्प पूर्ण झाल्यास वाहतुकीचा ताण कमी होईल, असे नगरविकासमंत्री शिदे यांनी या वेळी सांगितले.

घणसोली, ऐरोली उर्वरित रस्त्यावर खाडीपूल बांधण्याबाबतच्या प्रकल्पाचा आढावा बैठकीत घेण्यात आला. या संदर्भात सिडको आणि नवी मुंबई महापालिका या दोन संस्थांनी समन्वयातून तांत्रिक बाबी पूर्ण कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. सागरी किनारपट्टी नियंत्रण अधिनियम (सीआरझेड) आणि कांदळवन हा महत्त्वाचा विषय असून कांदळवन सुरक्षित ठेवून कामे करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

ऐरोली येथील सागरी जैवविविधता केंद्राचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी वन विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करावा, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

सूचना काय?

– तुर्भे रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या सेक्टर २० मधील भुयारी मार्गाचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात यावे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात गवळी देव ते सुलाई देवी वन पर्यटनस्थळाला निधी द्यावा. रोपवेची आवश्यकता आहे का याची तपासणी करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.

– कळवा ऐरोली एलिव्हेटेड प्रकल्प, नवी मुंबईतील भूमिपुत्रांचे प्रलंबित प्रश्न, याबाबतही या वेळी चर्चा झाली. या संदर्भात सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत बैठक घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

Leave a comment

0.0/5