Skip to content Skip to footer

पुणे झालं ‘महापुणे’ ! मुंबईला मागे टाकत राज्यातील सर्वात मोठं शहर

मुंबईला मागे टाकत पुणे राज्यातील सर्वात मोठे शहर…

पुणे महापालिकेच्या हद्दवाढीवर अखेर शिक्कामोर्तब झाले असून महापालिका क्षेत्राला लागून असलेल्या 23 गावांचा महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने अखेर घेतला आहे. बुधवारी याबाबतची अधिसूचना राज्य सरकारने प्रसिद्ध केली. २३ गावांचा नव्याने समावेश झाल्याने पुणे हे मुंबईला मागे टाकत राज्यातील सर्वात मोठे शहर बनले आहे. मुंबई शहराचे क्षेत्रफळ हे सुमारे ४४० चौरस किलोमीटर असून, त्यापेक्षा पुण्याचे क्षेत्र हे वाढणार असल्याने पुणे हे आता ‘महापुणे’ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निर्णयामुळे भविष्यकाळात पुणे ही राज्यातील सर्वाधिक मोठी महापालिका ठरणार आहे.

प्रशासनाच्या अंदाजानुसार, २३ गावे समाविष्ट झाल्यानंतर पुणे महानगरपालिकेची हद्द जवळपास ४८५ चौरस किलोमीटर होईल, तर मुंबई महानगरपालिकेची हद्द सुमारे ४४० चौरस किलोमीटर आहे. नव्याने समाविष्ट गावांपैकी तीन गावांची ग्रामपंचायत निवडणूक घेण्यास विरोध करणारी याचिका हायकोर्टाने मंगळवारी फेटा‌ळली होती. त्यानंतर सरकारने अवघ्या २४ तासांत ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्याची अधिसूचना काढली. प्रशासनाच्या अंदाजानुसार, ही गावे समाविष्ट झाल्यानंतर महापालिकेची हद्द ४८५ चौरस किलोमीटर, तर महसूल विभागाच्या दाव्यानुसार महापालिकेची हद्द ५१६ चौरस किलोमीटर होणार आहे.

दरम्यान, २३ गावांचा महापालिकेत समावेशाच्या बहुप्रतीक्षित निर्णयामुळे या गावांच्या नियोजनबद्ध विकासाचा मार्ग मोकळा झाला. बड्यांचे हितसंबंध, राजकारण आणि बदलती सरकारे यांमुळे हा निर्णय २३ वर्षांपासून लटकला होता. नव्या २३ गावांच्या समावेशाने पुण्याचे क्षेत्रफळ ४८५ चौरस किलोमीटर होणार आहे. त्यामुळे मुंबईला मागे टाकत पुणे हे आकाराच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठी महापालिका होणार आहे.

नव्याने समावेश होणाऱ्या गावांची नावे पुढीलप्रमाणे :
-बावधन बुद्रूक -खडकवासला -म्हाळुंगे -सूस -वाघोली -मांगडेवाडी -भिलारेवाडी -किरकटवाडी -कोंढवे धावडे
-मांजरी बुद्रूक -नांदेड -न्यू कोपरे -नऱ्हे -पिसोळी -शेवाळवाडी -गुजर निंबाळकरवाडी -जांभूळवाडी -होळकरवाड -औताडे हांडेवाडी -सणसनगर -नांदोशी -कोळेवाडी -वडाची वाडी

Leave a comment

0.0/5