Skip to content Skip to footer

गणेशभक्तांनो, वेळ घेऊनच विसर्जनाला या!

गणपती विसर्जनाला दरवर्षी मुंबईत विशेषत: गिरगाव चौपाटीवर होणारी गर्दी टाळण्यासाठी पालिकेच्या डी विभाग कार्यालयाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरवले आहे. विसर्जनाची गर्दी एकवटू नये, यासाठी एक मोबाइल अ‍ॅप तयार करण्यात येणार आहे. या अ‍ॅपद्वारे विसर्जनाची वेळ निश्चित करूनच भाविकांना येता येईल.

गणेशोत्सवाला आता एक महिन्यापेक्षाही कमी कालावधी आहे. करोनाचे विघ्न असल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सरकारी यंत्रणांमार्फत केले जात आहेत. पालिका प्रशासनाने सार्वजनिक आणि घरगुती गणपतींसाठी नियमावली जाहीर केली आहे. सार्वजनिक मूर्तीची उंची कमी करण्यात आली असून घरगुती गणपतीचेही घरच्या घरी किंवा पुढच्या वर्षी विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरवर्षी मुंबईत ११ दिवसांत तब्बल दोन ते अडीच लाख मूर्तीचे विसर्जन होते. या वर्षी हे प्रमाण कमी होण्याची शक्यता असली तरी काही प्रमाणात तरी मूर्ती विसर्जनासाठी येतील, हे गृहीत धरून पालिकेने नियोजन करण्यास सुरुवात केली. गिरगाव, नानाचौक, ताडदेव, मलबार हिलचा परिसर असलेल्या डी विभाग कार्यालयाने विसर्जनाची गर्दी कमी करण्यासाठी मोबाइल अ‍ॅप तयार करण्याचे ठरवले असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मुंबईत ६९ नैसर्गिक विसर्जन स्थळे असून साधारण ३२ कृत्रिम तलाव पालिकेतर्फे तयार केले जातात. या वर्षी नैसर्गिक विसर्जन स्थळावरील समुद्रावरील गर्दी कमी करण्यासाठी प्रत्येक विभागात मोठय़ा प्रमाणावर कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार आहेत. या अ‍ॅपमुळे भाविकांना वेळ ठरवून येता येईल. कृत्रिम तलावावर फक्त मूर्ती देऊन त्यांनी निघून जायचे आहे.  एका वेळेला साधारण दहा ते पंधरा लोकांना वेळ दिला जाईल, अशी माहिती या विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

विसर्जनासाठी एका वेळी पाचपेक्षा जास्त भाविकांनी येऊ नये तसेच विसर्जनस्थळी आरती करू नये असे आवाहन केले असले तरी एकाच वेळी सगळे विसर्जनाला बाहेर पडले तर गर्दी होईल. गणपतीच्या पहिल्या दिवसापासून अनंत चतुर्दशीपर्यंत हे अ‍ॅप कार्यरत राहील.

– प्रशांत गायकवाड, साहाय्यक महापालिका आयुक्त, डी विभाग

Leave a comment

0.0/5