पाकिस्तानच्या ताब्यात असलेला हिंदुस्थानचा वीर विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेची प्रक्रिया पूर्ण झाली असून दुपारनंतर त्यांना अटारी-वाघा बॉर्डवरून हिंदुस्थानात आणण्यात येईल. त्यानंतर त्यांना अमृतसर येथून दिल्लीला नेण्यात येईल अशी माहिती देण्यात येत आहे.
यासंदर्भात माहिती अमृतसरचे पोलीसचे उप पोलीस आयुक्त शीव दुलार सिंग ढिल्लोन यांनी माहिती दिली. अभिनंदन हिंदुस्थानात किती वाजता पोहोचतील याची निश्चित माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. मात्र अटारीवरून ते हिंदुस्थानात प्रवेश करतील. त्यांचे स्वागत करण्यासाठी हवाई दलाचे पथक येथे हजर असेल. हे पथक त्यांना अमृतसर येथून विशेष विमानाने दिल्लीला नेतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली. पाकिस्तानने दिलेली वागणूक, तिथला घटना क्रम यासंदर्भात हवाई दलाचे अधिकारी आणि सुरक्षा यंत्रणा त्याच्याकडून माहिती घेतील, असे ही समजते आहे.
अभिनंदन यांनी पाकिस्तानच्या ताब्यात गेल्यानंतर देखील जे शौर्य, साहस दाखवलं त्यामुळे सारे त्यांचे कौतुक करत आहेत. त्यांच्या हिंदुस्थानात परतण्याच्या वाटेवर साऱ्यांचे लक्ष लागले आहे.