Skip to content Skip to footer

एअर स्ट्राईक आणि माध्यमांचे पतन

फेब्रुवारी 14 रोजी जम्मू काश्‍मीर येथील पुलवामा येथे भारतीय सुरक्षा रक्षकांवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे जवान हुतात्मा झाले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या भ्याड हल्ल्याची जबाबदारी घेतली. साहजिकच त्यानंतर देशभरात संतापाची एकच लाट उसळली व पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी जोर धरू लागली. कारण जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा म्होरक्‍या अझहर मसूद यास पाकिस्तानचा उघड पाठींबा आहे व तो त्याच देशात आश्रयास आहे. या संघटनेच्या काश्‍मीर परिसरातील कारवाया व त्याला पाकिस्तानची असणारी छुपी फूस या कारणामुळे यावेळी एकदाचे काय व्हायचे ते होऊ दे पण पाकला धडा शिकवा, अशा मागणीचा दबाव वाढत गेला. त्यातच सर्जिकल स्ट्राईकचा अनुभव सैन्याच्या गाठीशी असल्याने असा सूर देशभरातून उमटला नसता तरच नवलच!

त्यानुसार, फेसबुक आदी सोशल माध्यमात पाकिस्तानविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया उमटल्या जे कि स्वाभाविक होते. इतका गंभीर व जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय माध्यमांनी प्राधान्यावर घेतला नसता तर ते पण एक नवलच असते. किंबहुना तो तसा घेतलाही गेला पाहिजे. पण ज्या अभिनिवेशपूर्ण आवेशात माध्यमांवर तावातावाने बोलत होते त्यावरून बातमीतील तथ्य सांगण्याऐवजी लोकांच्या मनाला सुखावेल अश्‍या विश्‍लेषणाने वातावरणनिर्मिती ‘लोकरूची’ फंडा माध्यमांनी राबवला. पुलवामा हल्ल्यानंतर पाकला उत्तर देण्याची मागणी भारतात जोर धरू लागल्यानंतर सरकारवर देखील कारवाईबाबत दबाव वाढत होता.

तेव्हा भारत काहीतरी कारवाई करणार याची जाणीव झाल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एक व्हिडीओ जारी करून भारताने हल्ला केल्यास आम्ही पण प्रत्युत्तर देऊ. अशी दर्पोक्ती केली. भलेही पाकचे लष्करी सामर्थ्य भारतापुढे नगण्य असले तरी पंतप्रधान या नात्याने खान यांनी असे बोलणे साहजिकच.

पण यानंतर मराठीतील काही माध्यमांनी बातमीचे वार्तांकन, निवेदन करताना शिवाय स्पेशल रिपोर्टस मध्ये इम्रान खानचा उल्लेख एकेरी केला. जनतेच्या मनातील विषय व जनतेचे प्रश्‍न माध्यमांनी मांडलेच पाहिजेत. पण ते मांडताना काही नैतिक मर्यादाही पाळली पाहिजे. पण लोक भावनेवर स्वार होऊन ज्या पद्धतीने काही भारतीय माध्यमांनी हा विषय हाताळला तो पत्रकारितेच्या कोणत्या चौकटीत बसतो? आणि जर बसत असेल तर मग सर्वसामान्य लोकांच्या सोशल मीडियावरील प्रतिक्रिया आणि जनतेला नैतिकतेचा मार्ग दाखवणाऱ्या माध्यमांच्या प्रतिक्रिया यात काय फरक राहिला? असा प्रश्‍न निर्माण होतो.

भारताने पाकच्या भूमीमध्ये घुसून दहशतवादी तळ उध्वस्त केले. त्याचा जरूर एक भारतीय म्हणून सर्वाना अभिमान आहे. आणि असायला पाहिजे. पण त्याचे उन्मादात रूपांतर होऊ दिल्यास ते एकूणच देशासाठी घातक सिद्ध होऊ शकते याची जाणीव सामान्य लोकांना नसली तरी माध्यमांना असते. निदान ती असायला हवी. खरेतर समाजातील खदखदणाऱ्या असंतोषाला विधायक वळण देणे माध्यमांचे कर्तव्य असते आणि जबाबदारी सुद्धा. आणि जर ते करू शकत नसू तर निदान त्या असंतोषाला वाईट वळण दिले जाणार नाही जेणेकरून समाजात उन्माद उत्पन्न होणार नाही, याची काळजी तरी माध्यमांनी घ्यायला हवी.

Leave a comment

0.0/5