Skip to content Skip to footer

महिला दिन 2019 : अंधार जाळून केली प्रकाशाची पेरणी

वडिलांचे छत्र हरपल्यानंतर केवळ आईचाच आधार… नातेवाईकांनीही दूर केले… घरात वीज नसतानाही परिस्थितीवर मात करीत अकरा वर्षे मिणमिणत्या दिव्याखाली अभ्यास करीत एकाच कुटुंबातील दोन बहिणी आज देशाच्या सीमेचे रक्षण करीत आहेत. सशस्त्र सीमा दल (एसएसबी) या निमलष्करी दलात भरती होऊन नम्रता बेळगुंदकर व मेघा बेळगुंदकर या आंबेवाडीतील सख्ख्या बहिणी आज रणरागिणी ठरल्या आहेत.

अत्यंत गरीब कुटुंब असलेल्या बेळगुंदकर कुटुंबीयांचे कर्ते निंगाप्पा बेळगुंदकर हे ट्रक बॉडी बिल्डिंगचे काम करीत होते. १९९४ मध्ये त्यांचे निधन झाले. संपूर्ण कुटुंबांचा गाडा ओढण्याची वेळ पत्नी सावित्री यांच्यावर आली. सावित्रीबाई फुलेंप्रमाणेच त्यांनी शिक्षणाचा जागर करत आपल्या चारही मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने सावित्री यांनी मोलमजुरी करून मुलांचे शिक्षण सुरू ठेवले.

तीन बहिणींवर एक लहान भाऊ असा परिवार. सातवीमध्ये असतानाच मोठी मुलगी प्रतिभा मामाकडे गेली. त्यांनीच तिचे पालनपोषण करून लग्न करुन दिले. घरी नम्रता, मेघा व भाऊ उमेश तिघेच राहिले. भाऊबंदकीतून वाटणीला आलेल्या एकाच खोलीचे घर. त्यामध्येच सर्वांचे वास्तव्य. पण, अशाही परिस्थितीवर मात करीत आई सावित्री यांनी काबाडकष्ट करुन मुलांचे शिक्षण पुढे सुरूच ठेवले.

आंबेवाडीतील सरकारी मराठी शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर भगतसिंग हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षणाची सोय झाली. नम्रता व मेघा शाळेला जात. त्यामुळे त्यांना शिक्षकांनी मदतीचा हात पुढे केला. वह्या, पुस्तके दिली. नववीला असताना न्रमताची ज्युडोसाठी निवड झाली. तेथून नम्रताचे नशीब पालटले. ज्युडोमधून तिची निवड राष्ट्रीय पातळीवर झाली.

नम्रताला कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळाली. राष्ट्रीय पातळीवरील ज्युडोचे पदक पटकाविले. नंतर दोघींनी सैन्यात भरती होण्याचे ठरविले. यासाठी सीमा सुरक्षा दलाची निवड केली. दोघीनी एकाच वेळी भरतीसाठी प्रयत्न चालविले. मात्र यात नम्रताने प्रथम बाजी मारली. हिमाचलमधील कुलुमनाली येथे झालेल्या निवड प्रक्रियेत ती पात्र ठरली.

तीन महिन्यांनंतर त्याच ठिकाणी झालेल्या भरतीमध्ये मेघानेही पात्रता गाठली. शारीरिक चाचणीवेळी धावताना मेघा पडल्याने तिचा हात मोडला. तिच्यासमोर त्याच वेळी निवडीचे आव्हान होते. हात मोडला तरी तिने शारीरिक चाचणी पूर्ण होईपर्यंत ते दाखवून दिले नाही. ती भरतीमध्ये पात्र ठरल्याचे समजल्यानंतर तिने हाताला प्लास्टर लावले. घरच्यांनाही ते उशिराच समजले. नम्रताने प्रशिक्षणानंतर पहिली सेवा आसाममध्ये केली. तर मेघाची सेवा अरुणाचल प्रदेशमधून झाली. आज दोघीही भारतीय सीमेचे संरक्षण करीत आहेत. तर लहान भाऊ उमेश हा टिळकवाडी बालिका आदर्शमध्ये शिक्षक म्हणून शारीरिक शिक्षणाचे धडे देत आहे.

…अन्‌ विजेचा दिवा दहा वर्षांनी पेटला
खोलीवजा घरात राहताना नातेवाईकांनी खोलीत असलेल्या एकमेव दिव्याची जोडणीही तोडली. २००१ मध्ये ही घटना घडली. मात्र, यानंतर दहा वर्षे त्या घरात विजेचा दिवा कधीच पेटला नाही. चारही भावंडांनी मिणमिणत्या चिमणीखाली शिक्षण पूर्ण केले. नम्रता आणि मेघा यांनी निमलष्करी दलातील प्रशिक्षण पूर्ण होऊन सेवेला प्रारंभ केल्यानंतर २०११ मध्ये घरातील विजेचा दिवा पेटला.

Leave a comment

0.0/5