Skip to content Skip to footer

Lok sabha 2019 ‘जनता काँग्रेसला पाकिस्तानची एजंट समजतेय’, प्रवक्त्याचा तडकाफडकी राजीनामा

लोकसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसला लोकं पाकिस्तानचा एजंट म्हणू लागले आहेत, असे म्हणत बिहार काँग्रेसचे प्रवक्ते आणि वरिष्ठ नेते विनोद शर्मा यांनी राजीनामा दिला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शर्मा यांनी राजीनामा दिल्याने बिहार काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.

काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या आमदाराची मंत्रिपदी वर्णी

विनोद शर्मा म्हणाले की, पुलवामा हल्ल्यानंतर हिंदुस्थानी लष्कराने पाकिस्तानमधील बालाकोट येथे घुसून कारवाईमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांची यादी काँग्रेस मागत आहे. काँग्रेसची ही भूमिका देशासाठी नक्कीच दुर्भाग्यपूर्ण आहे. बालाकोटमध्ये वायूसेनेने बॉम्ब फेकले हे सत्य आहे. यामुळे त्या भागात 70 फुटांचे खड्डे झाले आहेत. 70 फुट खड्डा आणि आग यामुळे कोणताही दहशतवादी वाचणे शक्य आहे का? परंतु सातत्याने या गोष्टीचे भांडवल करून राजकरण करणे योग्य वाटत नाही. मी गेल्या 30 वर्षापासून पक्षासोबत काम करत आहे, आणि पक्षाच्या या भूमिकेमुळे मी दु:खी झालो आहे. पक्षापेक्षा देशहित महत्त्वाचे आहे, त्यामुळे राजीनामा देत असल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले.

राजीनामा देण्यापूर्वी आपण काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्र पाठवून परिस्थितीबाबत कळवले होते. याआधीही शेकडो पत्र पाठवून जनतेची भावना ओळखा असे सांगितले होते. तसेच पक्षातील कार्यकर्त्यांची भावनाही समजून घ्यायला हवी. कार्यकर्ते देखील देशहितविरोधात वक्तव्य करू नये अशा मताचे आहेत, असे शर्मा म्हणाले. जनता लष्कराच्या सोबत उभी राहण्यास तयार आहे आणि सर्व पक्षांनी लष्कराला पाठिंबा द्यायला हवा. परंतु दुर्भाग्याने काँग्रेस सध्या चुकीचे पाऊल उचलत आहे. काँग्रेस लष्कारचे धैर्य मोडण्याचे काम करत आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच काँग्रेस आपल्या मार्गावरून भटकली असल्याचेही शर्मा म्हणाले.

इंदिरा गांधी-राहुल गांधीमध्ये प्रचंड अंतर

शर्मा पुढे म्हणाले की, देशाची सुरक्षा आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आज संपूर्ण देश 47 वर्षानंतरही इंदिरा गांधी यांनी पाकिस्ताचे दोन तुकडे केले म्हणून कौतुक करते. माजी पंतप्रधान वाजपेयी यांनी देखील इंदिरा गांधी यांच्या धैर्याचे कौतुक केले होते. परंतु राहुल गांधी जनतेची भावना समजू शकले नाहीत. लष्कराचा पराक्रम आणि शौर्याचे राजकारण करून त्यांना कमी दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा स्थितीत काँग्रेसमध्ये राहण्यास योग्य वाटत नसल्याने राजीनामा दिल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले. तसेच सध्या कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे शर्मा म्हणाले असले तरी ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

Leave a comment

0.0/5