Skip to content Skip to footer

गंगायात्रेपूर्वी प्रियांका गांधींचे पत्र; मिळून बदलू राजकारण

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने प्रियांका यांचे हे पत्र प्रसारित केले असून, ‘काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मला उत्तर प्रदेशात पक्षाची जबाबदारी सोपवली आहे. उत्तर प्रदेशशी माझे खूप जुने आणि आत्मिक नाते आहे. राज्याचे राजकारण बदलण्याची माझी जबाबदारी असून, त्यासाठी तुमची साथ हवी आहे,’ अशी भावनिक साद प्रियांका यांनी पत्रातून घातली आहे.

प्रियांका या चार दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यात ते अनेक शहरांना भेट देणार आहेत. त्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की उत्तर प्रदेशच्या जनतेशी माझे खूप जुने आणि आत्मिक नाते आहे. आज तुमच्या सर्वांच्या साथीने मला उत्तर प्रदेशचे राजकारण बदलण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आज राज्यातील युवक, महिला, शेतकरी आणि कामगार सारेच अनेक समस्यांना तोंड देत आहेत. त्यांच्या अडचणी मनमोकळेपणाने सांगायच्या आहेत. परंतु, राजकारणाच्या गोंधळात युवक, महिला, शेतकरी आणि कामगारांचा आवाज राज्याच्या धोरणातून गायब झाला आहे.

तुमच्याशी संवाद साधल्याशिवाय, तुमच्या अडचणी जाणून घेतल्याशिवाय राज्यातील परिवर्तनाची सुरुवात होत नाही. त्यामुळे, तुमच्याशी थेट संवाद साधण्यासाठी मी तुमच्या दारी येत आहे. मी जलवाहतूक, बस, रेल्वे, पदयात्रा या सर्व मार्गांनी तुमच्यापर्यंत पोचेन. गंगा नदी उत्तर प्रदेशचा आधार आहे. गंगा ही सच्चेपणा आणि समानतेचे प्रतीक आहे. ती कोणताही भेदभाव करीत नाही. मी गंगाजीचा आधार घेऊन तुमच्यापर्यंत पोचेन. तुमच्याशी संवाद साधल्यानंतर, तुमच्या अडचणी ऐकूण घेतल्यानंतर आपण एक संकल्प करून राजकारणात परिवर्तन घडवून आणू शकू. एकत्रितपणे तुमच्या अडचणींवर मात करू शकू.

Leave a comment

0.0/5