Skip to content Skip to footer

१९९१ ला आम्ही अजित पवार यांना निवडून आणून, एका भ्रष्टाचारी नेत्याला जन्म दिला – विजय शिवतारे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीच्या भाजपा पक्षाच्या उमेदवार कांचन कुल यांची खडकवासला येथे जाहीर प्रचार सभा होती या सभेला शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीचे माजी मंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. यावेळी राज्याचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर चांगलीच टोलेबाजी सुद्धा केली. १९९१ ला आम्ही अजित पवार यांना निवडून आणले आणि एका भ्रष्टाचारी नेत्याला जन्म दिला असा घणाघात विजय शिवतारे यांनी यावेळी केला. यावेळी शिवतारे म्हणाले की, १९९१ ला दुध विकणारे अजित पवार यांना विजयी करा अशी गळ खुद्द पवार साहेबांनी घातली होती. त्यांनतर आम्ही अजित पवार यांना निवडून आणले आणि तेव्हाच आम्ही एका भ्रष्टाचारी नेत्याला जन्म दिला. पुढे शिवतारे म्हणाले की, शरद पवार साहेबांबद्दल मला आदर आहे. पण जेव्हा प्रश्न देशाचा येतो तेव्हा आधी देश त्यानंतर पक्ष आणि पक्ष नेते. त्यामुळे आता बारामती मतदार संघात ७० वर्ष चालत आलेली परंपरा मोडायची आहे.

तसेच विजय शिवतारे म्हणाले की, ही निवडणूक कांचन कुल विरुद्ध सुप्रिया सुळे एवढीच मर्यादित नसून गेली ७० वर्ष चालत आलेली पवार कुटुंबियांची परंपरा मोडीत काढायची आहे. त्यासाठी आता सगळ्यांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे. एकदा का यावेळी सुप्रिया सुळे यांचा निवडणुकीत पराभव केला की कायमची कीड निघून जाईल असा घणाघात देखील यावेळी शिवतारे यांनी केला. दरम्यान, यावेळी व्यासपीठावर महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजपच्या उमेदवार कांचन कुल, भीमराव तपकीर, राहुल कुल , विजय शिवतारे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील समुदायाला संबोधित केले. येणाऱ्या निवडणुकीला शेवटचे तीन दिवस बारामती मतदार संघात तळ ठोकून बसणार आहे आणि ५००० हजार कार्यकर्त्यां बरोबर बारामती मतदार संघात जनतेच्या गाठीभेटी घेणार आहे असे सुद्धा पाटील यांनी बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5