Skip to content Skip to footer

मुंबई, पुण्यानंतर आता नागपुरात देखील निर्बंध लागू, ‘जाणून घ्या’ नवीन नियम

 

महाराष्ट्र बुलेटिन : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे, यवतमाळ, अमरावती, अकोल्यामध्ये पुन्हा एकदा निर्बंध लावण्यात आले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील जनतेशी संवाद साधताना रविवारी स्पष्ट केले होते की, येत्या आठ दिवसांमध्ये राज्यात लॉकडाऊन लागू करावे की नाही याबात निर्णय घेतला जाईल. अशातच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितिन राऊत यांनी माहिती दिली आहे की मुंबई पुण्याप्रमाणेच नागपूरमध्येही निर्बंध लावण्यात आले आहेत.

नवीन नियम कसे आहेत त्याबाबत जाणून घेऊया…

– कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने ७ मार्चपर्यंत शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस बंद राहतील.
– आठवड्याच्या अखेरीस मुख्य बाजारपेठा या बंद असतील.
– ५० टक्के ग्राहक क्षमतेने हॉटेल्स, रेस्तरॉ सुरु राहतील.
– २५ फेब्रुवारी ते ७ मार्चपर्यंत लग्नाचे हॉल्स बंद राहतील.

दरम्यान नितीन राऊत यांनी स्पष्ट केले की लॉकडाऊन नसले तरी निर्बंध अधिक कडक केले जातील. जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ शकेल. विदर्भाच्या बाबतीत आढावा घेतला तर सर्वाधिक रुग्ण हे नागपूर येथे आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत की महापालिका व जिल्हा प्रशासनाने चाचण्या वाढवण्यासह रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचावे. तसेच मास्क परिधान न करणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणे यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे रेल्वेस्थानक, विमानतळ, बसस्थानक, मॉल्स व इतर ठिकाणातील गर्दीवर लक्ष ठेवून नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.

Leave a comment

0.0/5