Skip to content Skip to footer

कोल्हापुरात महिला आयपीएसवर रोखले पिस्तूल; राष्ट्रवादीच्या माजी उपमहापौर पतीच्या मटका अड्ड्यावर छापा

कोल्हापुरातील यादवनगर परिसरातील माजी महापौरांच्या पतीच्या मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या परिक्षाविधीन सहायक पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्यासह पोलिसांच्या पथकावर हल्ला करण्यात आला. पोलिसांनी माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादीच्या नगरसेविका शमा मुल्ला यांच्यासह १३ संशयितांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, हल्लेखोरांनी पोलिसांकडील पिस्तूल हिसकावून पोलिसांवरच रोखल्याने खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी, सहायक पोलिस अधीक्षक शर्मा या सोमवारी रात्री आठच्या सुमारास सहा पोलिस कर्मचाऱ्यांसह पांजरपोळ येथील मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेल्या होत्या. मटका अड्ड्यावर छापा टाकून त्यांनी चार संशयितांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या तरुणांनी चौकशीत हा अड्डा शमा मुल्ला यांचे पती सलीम मुल्ला याचा असल्याचे सांगितले. त्यावेळी शर्मा या दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह जवळच असलेल्या मुल्ला यांच्या घरात गेल्या. त्यावेळी काही तरुणांनी पोलिसांवर हल्ला चढवला. शर्मा यांच्या रक्षक कर्मचाऱ्याकडील पिस्तूल हिसकावून घेऊन ते शर्मा यांच्यावर रोखले. पोलिसांकडून हिसकावलेले पिस्तूल घेऊन तरुणांनी पळ काढला.

या प्रकाराची वरिष्ठांना माहिती समजल्यानंतर घटनास्थळी पोलीस फौजफाटा दाखल झाला. याप्रकरणी माजी उपमहापौर शमा मुल्ला यांच्यासह १३ जणांना ताब्यात घेतले. पोलिसांवर झालेल्या हल्ल्यानंतर परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते. पिस्तूलासह हल्लेखोर सलीम मुल्ला पसार झाला आहे.

Leave a comment

0.0/5