छप्पन पक्षांनी एकत्र येऊन केलेली युती म्हणजे भोक पडलेला फुगा असून ५६ नाही तर १५६ पक्ष एकत्र आले तरी हा फुगा फुगणार नाही अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी महाआघाडीची खिल्ली उडवलेली होती. चंद्रपुरात महायुतीचे उमेदवार हंसराज अहिर प्रचारासाठी वणी येथे उद्धव ठाकरे यांची सभा झाली तर यवतमाळ-वाशीम मतदासंघातील उमेदवार भावना गवळी यांच्या प्रचारासाठी यवतमाळच्या पोस्टल ग्राऊंडवर हजारोंच्या जनसमुदायाला उद्धव ठाकरे यांनी महायुतीला भरघोस मतांनी निवडून द्या, अशी साद घातली. एकाही शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये असे राज्य मला हवे आहे, असे ते या वेळी म्हणाले.
शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे आणि त्यासाठी घालण्यात आलेल्या पात्र-अपात्रतेच्या अटीतटी दूर करून टाका, असे आपण मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी व पीक विमा यासाठी तालुका पातळीवर मदत केंद्र झालीच पाहिजे, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मुंबईत आलेल्या मोर्चाची आठवण त्यांनी या वेळी करून दिली. त्या मोर्चात शेतकरी लाल बावटा घेऊन होते. बावटा कोणताही असो, पण त्यांच्या पायातून वाहणारं रक्त अन्यायाला वाचा फोडणारं होतं, असे ते म्हणाले. धनगर समाजाला आरक्षण देणारच, पण ते देताना आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, अशी ग्वाही ही उद्धव ठाकरे यांनी या वेळी दिली होती.
या जाहीर सभांमध्ये बोलताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, शिवसेनेच्या शेतकरी हिताच्या भूमिका भाजपाने समजावून घेऊन त्या जाहीरनाम्यात समाविष्ट केल्या व त्या सोडवण्यासाठी सकारात्मक कामसुद्धा केले आहे. त्यामुळे आम्ही एक कुटुंब म्हणून एकत्र आलो आहे. मी जर खोटे बोललो असतो, माझ्या स्वार्थासाठी युती केली असती तर हे उघडपणे बोलण्याचे धाडस करू शकलो नसतो. अत्यंत प्रामाणिकपणाने हा जो वसा घेतला आहे, तो घेऊन मी पुढे चाललो आहे. जो कट्टर शिवसैनिक आहे, तो कधीही गद्दारी करणार नाही, दगा करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखविले होते.