Skip to content Skip to footer

नक्षलींचे डोके ठेचायला लागेल – उद्धव ठाकरे

आधी दंतेवाडा आणि आता जांभूरखेडा हे दोन्ही हल्ले म्हणजे नक्षल्यांनी वर काढलेले डोके असून ते आताच ठेचावे लागेल, अशी भूमिका शिवसेना पक्ष प्रुमख उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे. जम्मू- काश्मीरमधून जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे नामोनिशाण मिटवणारे केंद्रातील मोदी सरकार नक्षलवाद्यांचेही डोके ठेचवण्यात यशस्वी होईल याविषयी शंका नाही, असे देखील उद्धव ठाकरे म्हटले आहे. राज्यभर महाराष्ट्र दिन साजरा होत असताना नक्षलवाद्यांनी गडचिरोलीतील कुरखेडाजवळ बुधवारी भूसुरुंग स्फोट घडवला. त्यात शीघ्रकृती पथकाचे १५ जवान शहीद झाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने गुरुवारी सामनाच्या अग्रलेखातून नक्षलवादाविषयी भाष्य केले आहे. “गडचिरोलीतील हल्ल्याने नक्षली आव्हान किती कठीण आहे हेच दाखवून दिले. तसेच नक्षलविरोधी कारवायांमधील कच्चे दुवे आणि उणिवा पुन्हा चव्हाट्यावर आल्या”, याकडे सुद्धा लक्ष वेधले आहे.

नक्षल्यांना थांगपत्ता लागू नये यासाठी नक्षलविरोधी पथकातील जवानांची वाहतूक खासगी वाहनांमधून केली जाते. तरीही जांभूरखेडा येथे नक्षल्यांनी खासगी वाहनातून जाणाऱ्या जवानांना लक्ष्य केले. जवानांविषयीची बित्तंबातमी नक्षलीपर्यंत कोणी पोहोचवली, हे देशद्रोही कोण होते, असा सवालच विचारला गेला आहे. सरकारी पातळीवरुन चौकशी करुन कारवायांचे दंडुके आपटले जातील, पण हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे काय, याचे उत्तर मिळणार नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे. नक्षलींचे डोके आताच ठेचावे लागेल, कारण या डोक्यांमध्ये जिहादी हवा भरण्याचेही उद्योग सुरु आहेत. नक्षल्यांच्या पोस्टर्सवर जम्मू- काश्मीर लिबरेशन फ्रंट आणि त्या संघटनेचा म्होरक्या यासिन मलिक याचे नाव दिसणे हा या कनेक्शनचा पुरावा आहे, असा दावाही केला गेला आहे.

Leave a comment

0.0/5