Skip to content Skip to footer

या चित्रपटात इम्रान हाश्मीच्या आजीने साकारली होती अमिताभ बच्चनच्या आईची भूमिका

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन लवकरच आनंद पंडित यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत बॉलिवूडचा सीरियल किसर अभिनेता इम्रान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. इम्रान आणि अमिताभ बच्चन पहिल्यांदाच एकत्र काम करताना रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगला नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. तसेच या चित्रपटाचे टायटलची देखील घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी इम्रान आणि अमिताभ बच्चन यांच्या सिनेमाचे नाव ‘चेहरे’ असे ठेवले आहे.

अमिताभ आणि इम्रान हे चित्रपटात पहिल्यांदा काम करत असले तरी इम्रानची आजी आणि अमिताभ यांनी एकत्र काम केले आहे. इम्राननेच सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना ही गोष्ट सांगितली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना इम्रानच्या लक्षात आले की, जंजीर या चित्रपटाला नुकतेच ४६ वर्षं पूर्ण झाले आहेत.

यावरूनच इम्रानने ट्वीटरला एक ट्वीट केले आहे की, हा एक योगायोग आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही, अमिताभ बच्चन यांच्यासोबत मी काल चित्रीकरणाला सुरुवात केली. त्यांच्यासोबत बोलत असताना माझ्या लक्षात आले की, कालच जंजीर हा चित्रपट प्रदर्शित होऊन ४६ वर्षं झाले. जंजीर या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात माझ्या आजीने त्यांच्या आईची भूमिका साकारली होती. ही भूमिका खूपच छोटीशी होती.

‘चेहरे’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करत असल्याची माहिती अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांना दिली होती. त्यासोबतच त्यांनी एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये निर्माते आनंद पंडित, अभिनेता इम्रान हाश्मी आणि अमिताभ बच्चन दिसत आहेत. या फोटोसोबत त्यांनी म्हटले आहे की, ‘बऱ्याच कालावधीपासूनचे कमिटमेंट आज पूर्ण झाले. या पोस्टसोबत त्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखदेखील सांगितली आहे.’

Leave a comment

0.0/5