Skip to content Skip to footer

जलशुद्धिकरणावर कोट्यवधी खर्च, पण पिण्यालायाक पाणी मिळेना

आळंदी- तीर्थक्षेत्र आळंदीत नागरिकांसह व भाविकांची गेल्या दहा वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची प्रशासनाने दाणदाण चालवली आहे.अलंकापुरीतील करदाते नागरिक, भाविकांकडून स्थानिक प्रशासनानेच नव्हे, तर जिल्हाधिकारी तहसीलदार, मंत्री, खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी आदींनी जणू जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. येथे जलशुद्धीकरण यंत्रणेसाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार कोट्यवधी रुपये खर्चून अद्यावत जलशुद्धीकरण यंत्रणेची उभारणी करण्यात आली. मात्र, आजवर नागरिकांना पिण्यालायक तसेच वापरासाठी पुरेसे पाणी ही पालिका देऊ न शकल्याने आळंदीकरांसह भाविक देखील नाराजी व्यक्‍त करीत आहेत

आळंदी शहरात सध्या भीषण पाणीटंचाई जाणवत असून शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. पालिकेने निर्माण झालेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी कंबर कसली असून पात्रातील जलपर्णी काढण्याबरोबरच पात्रातीलपाणी गुरुत्वीय बलानुसार थेट जमा होणाऱ्या पाण्याबरोबरच विद्युत मोटरच्या सहाय्याने उपसा करून जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचविले जाणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी दिली. मावळातील आंद्रा धरणातून पाणी सोडण्याबाबत मागणी केली असून पाणी प्रवाहाच्या वेगानुसार आठवडाभरात सिद्धबेट बंधाऱ्यात पोहोचेल. पाणीटंचाईवर मार्ग काढण्यासाठी पालिका सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. तरी तोपर्यंत नागरिकांनी पालिकेला पाणी नियोजनाबाबत सहकार्य करण्याचे, आवाहन देखील भूमकर यांनी केले आहे.

दी पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ व जलपर्णी साचल्याने आळंदी शहराला सिद्धबेट बंधाऱ्यातून पाणी पुरवठा करताना अडचणी निर्माण होत असून गाळामुळे पाणीपुरवठा यंत्रेणेवर ताण येण्याबरोबरच पात्रात पाणीपातळी देखील कमी राहत असल्याच्या कारणास्तव आळंदी पालिकेने खेडचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी संजय तेली यांच्याकडे सिद्धबेट बंधाऱ्यातील गाळ काढण्यास परवानगी मागितली होती. त्याबाबतच्या अर्जावर उपविभागीय अधिकारी तेली यांनी राष्ट्रीय हरिद लवादाच्या निर्णयाचा आधार घेत इंद्रायणी नदीपात्रातील वाळू लिलाव प्रक्रिया पार पडली नसल्याने श्रमदानातून गाळ काढण्यास परवानगी देत येत नाही. तसेच वाळू लिलाव प्रक्रियेनंतरच पालिकेच्या मागणीचा विचार करता येणार असल्याचे नमूद केले आहे. यामुळे तूर्तास तरी पालिकेला केवळ जलपर्णी हटविता येणार असून गाळ काढण्याचे काम लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे.

Leave a comment

0.0/5