Skip to content Skip to footer

नऊ महिन्याच्या बालकाला बिबट्याने झोपेतून पळविले

चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथील एका घरात घुसून रविवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास बिबट्याने एका नऊ महिन्याच्या बालकाला झोपेतून उचलून पळविल्याची घटना घडली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली.

स्वराज सचिन गुरुनुले असे मृत बालकाचे नाव आहे. गडबोरी येथील सचिन गुरनुले यांचे कुटुंब शनिवारी नेहमीप्रमाणे घरी झोपी गेले. स्वराज हा बालक आईजवळ झोपला होता. आई आणि स्वराज गाढ झोपेत असताना पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास विबट तिथे आला. घरात शिरून आईसोबत खाटेवर झोपलेल्या स्वराजला बिबट्याने झोपेतच उचलले. दरम्यान, त्याची आई झोपेतून जागी झाली. तिने आरडाओरड केली व बिबट्याचा काही अंतरापर्यंत पाठलाग केला. परंतु बिबट्या बालकाला घेऊन वेगाने पसार झाला.

ही माहिती पहाटेच वनविभाग सिंदेवाही यांना दिली. परंतु वनविभागाचे कर्मचारी गडबोरी येथे सकाळी पोहताच बालकाचा शोध घेण्यास सुरूवात केली. गावकरी, पोलीस विभाग, वनविभाग यांच्या पुढाकारातून परीसर पिंजून काढला. अखेर गुरुनुले यांच्या घरापासून दोन कि. मी. अंतरावर स्वराजचा मृतदेह आढळला.

दरम्यान, याची माहिती गावकऱ्यांना होताच घटनास्थळी एकच गर्दी उसळली. सदर बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा, या मागणीसाठी स्वराजचा मृतदेह ग्रामपंचायतीमध्ये आणण्यात आला. आधी बिबट्याचा बंदोबस्त करा मगच शवविच्छेदन करा, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, वनविभागाकडून मृत बालकाचे वडील सचिन गुरूनुले यांना वनविभागाकडून ३० हजार रोख रक्कम देण्यात आली. मागील दोन महिन्यांपासून बिबट गावातील शेळ्या फस्त करीत असून गावात बिबट्याची दहशत असून गावकरी भयभित झाले आहे.

Leave a comment

0.0/5