Skip to content Skip to footer

एकाच वेळी चार बिबट्यांच्या हल्ला : दोन कालवडींचा मृत्यू, बाभळेश्वर येथील घटना

बाभळेश्वर : राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथे चार बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन कालवडींचा मृत्यू झाला. गुरुवारी (दि.०६) पहाटे ही घटना घडली. एकाच वेळी चार बिबटे परिसरात वावरत असल्याच्या घटनेला वनाधिकाऱ्यांंनीही दुजोरा दिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

बाभळेश्वर-लोणी रस्त्यावरील असलेल्या बेंद्रे वस्तीवरील ललता बाबुराव रोहोम यांच्या शेतात गायीचा गोठा आहे. या गोठ्याला चारही बाजूने कुंपन आहे. तरीही छोट्याशा जागेतून एकाचवेळी चार बिबट्यांनी गोठ्यात प्रवेश केला. बिबट्यांनी दोन कालवडींवर हल्ला केला. दोन तास बिबट्यांचा धुमाकूळ सुरू होता. अखेर आजूबाजूच्या ग्रामस्थांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्यांनी तेथून पळ काढला.

वनपरिक्षक एस. एन. जाधव, बी. एस. गाढे, बी. बी. सुरासे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी वनाधिकाऱ्यांनीही चार बिबटे असू शकतात असा दुजोरा दिला. परिसरातील बिबटे पकडण्यासाठी पिंजरे लावावेत, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी वनाधिकाºयांकडे केली.

बिबट्यांचा कायमच संचार..
लोणी, दुगार्पूर, दाढ, पाथरे या भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा संचार वाढत आहे. पाथरे येथे दोन दिवसांपूर्वी एका बिबट्याचा गुढरित्या मृत्यू झाला होता. आजपर्यंत अनेकांवर बिबट्यांचे हल्ले झाले आहेत. बिबट्याचे दर्शन तर हा या भागातील नागरिकांसाठी नित्याचीच बाब झाली आहे.

बिबट्यांचा संघटीत हल्ला प्रथमच..
आजपर्यंत एकाचवेळी दोन बिबट्यांनी दर्शन देणे, एका बिबट्याने हल्ला करणे, असा प्रकार घडत होते. मात्र गुरुवारी पहाटे प्रथमच एकाचवेळी चार बिबट्यांनी कालवडींवर केलेला हल्ला नागरिकांची चिंता वाढविणारा ठरला आहे. आता बिबटेही संघटित हल्ले करू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Leave a comment

0.0/5