Skip to content Skip to footer

बोदवडमध्ये ओडीएची पाईप लाईन पुन्हा फुटली

जि.जळगाव : संपूर्ण तालुकावासीयांसाठी संजीवनी ठरलेली ओडीए योजनेची जीर्ण पाईपलाईन ६ रोजी रात्री पुन्हा फुटली आहे. हिंगणा गावाजवळ आणि बोदवड शहराजवळ अशा दोन ठिकाणी ही पाईपलाईन फुटली आहे. यामुळे बोदवड शहरासह तालुक्यातील २६ गावांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

तालुक्याची तहान भागवणाऱ्या ओडीएच्या पाणीपुरवठा योजनेला घरघर लागली असून, या योजनेच्या पाईपलाइनला गत आठवड्यातच जोडणी करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला होता. परंतु ६ रोजी रात्री पुन्हा आठ वाजेच्या सुमारास हिंगणा गावाजवळ ही पाईपलाइन फुटल्याने पाणीपुरवठा बंद पडला तर शेकडो लीटर पाणी वाहून गेले. तसेच बोदवड शहरातील जामठीकडे जाणारी साडेतीन इंचाची पाईपलाइनही फुटली आहे. पाईपलाइन जोडणीचे कार्य सुरू आहे. शनिवार, दि ८ जूनपर्यंत पाईपलाइन जोडून पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता ओडीएचे कर्मचारी मनोहर पाटील यांनी सांगितले.

ओडीएच्या योजनेवरून पूर्वी ५१ गावांना पाणीपुरवठा होत असे. परंतु आता या योजनेत केवळ २६ गावे समाविष्ट आहेत. परिणामी या २६ गावांमधील पाणीपुरवठा शुक्रवारपासून पूर्णपणे ठप्प झाला आहे. आधीच पाणीटंचाईने हैराण झालेल्या नागरिकांसमोर पाईपलाईन फुटण्याचे नवीन संकट निर्माण झाले आहे.यापूर्वी रस्त्याच्या कामामुळे वारंवार पाईपलाईन फुटत आलेली आहे. आज पाईनपाईन नेमकी कशामुळे फुटली याचे निश्चित असे कारण समजू शकले नाही.

२००६ साली या पाईपलाईनची मुदत संपली. मुदतीपेक्षा अधिक कालावधी झालेला आहे आणि याच जीर्ण पाईपलाईनवर तालुकावासीयांची पाण्याची भूक भागविली आहे. या जीर्ण पाईपलाईनला पर्याय म्हणून दुसरी पाईनपाईन टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र त्याला वेळ लागणार आहे. अशा परिस्थितीत नवीन पाईपलाईनच्या कामाला गती देण्याची तालुकावासीयांची मागणी आहे.

पाईपलाईनला वारंवारच्या गळतीने तालुकावासीय त्रस्त झाले आहेत. तसेच ओडीएच्या पूर्णा नदी पात्रातही पाण्याची पातळी खालावल्याने गढूळ पाणी नळाला येत आहे. अजून किमान महिनाभर पाणीटंचाईचा सामना शहरवासीयांना करण्याची शक्यता आहे.

Leave a comment

0.0/5