Skip to content Skip to footer

खासदार जलील यांच्या अभिनंदन प्रस्तावावरून महापालिकेच्या सभेत गोंधळ

औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदन प्रस्तावाकडे महापौरांनी दुर्लक्ष केल्याने एमआयएमच्या नगरसेवकांनी आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ घातला. यावेळी राजदंड पळविण्याच्या प्रयत्न झाला, गदारोळ वाढत गेल्याने महापौरांनी एमआयएमची सहा नगरसेवकांचे सदस्यत्व एका दिवसासाठी रद्द केले.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महापालिकेत पहिलीच सभा होत आहे.महापालिकेतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी, उपायुक्तांना शासनाकडे परत पाठविणे, सव्वाशे कोटी रस्त्यांच्या यादीचा वाद, शहराचा पाणी प्रश्न आणि बछड्यांच्या नामकरण सोहळ्यात एमआयएम खासदारांना डावलल्यावरून आज होणारी महापालिकेची सर्वसाधारण सभा वादग्रस्त होण्याची चिन्हे होती.

सिद्धार्थ उद्यानातील चार बछद्यांच्या नामकरण सोहळा मागच्या आठवड्यात पार पडला. याच्या निमंत्रण पत्रिकेवर खासदार इम्प्तीयाज जलील यांचे नाव नव्हते. यावरून एमआयएम नगरसेवक महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आक्रमक होती. सभा सुरु होताच भाजप नगरसेवकांनी शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. तर एमआयएम नगसेवकांनी खा. जलील यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. महापौरांनी अभिनंदन प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले. यामुळे एमआयएम नगरसेवक आक्रमक झाली, त्यांनी महापौरांच्या समोरील जागेत धाव घेतली. यातच यातच भाजप नगरसेवकांनी पाणी प्रश्नावर घोषणाबाजी सुरु केली. यामुळे दोन्ही पक्षाची नगरसवेक समोरासमोर आली.
गोंधळ वाढत जात असतानाच एमआयएम नगरसेवकांनी राजदंड पळविण्याच्या प्रयत्न केला. यावरून महापौरांनी एमआयएमच्या सहा नगरसेवकांचे सदस्यत्व एका दिवसासाठी रद्द केले. यानंतर सभा तहकूब करण्यात आली आहे.मात्र एमआयएम नगरसेवक अभिनंदन प्रस्तावावरून सभागृहात बसून आहेत. विशेष म्हणजे या गोंधळात शिवसेना नगरसेवक कुठेच नव्हते. शिवसेनेचे महापौर यावेळी एकाकी पडल्याचे चित्र होते.
सर्वसाधारण सभेत हे मुद्दे पण आहेत चर्चेत 
अधिकाऱ्यांच्या मुद्यांवरून सभेत वादग्रस्त चर्चा होण्याची शक्यता आहे. सेवानिवृत्त उपायुक्त अय्युबखान आणि लेखाधिकारी एन.जी. दुर्राणी यांच्या विभागीय चौकशीच्या प्रस्तावावरून वादळी चर्चा होणे शक्य आहे, तर वर्षभरापूर्वी शासनाकडून प्रतिनियुक्तीने उपायुक्तपदी आलेल्या मंजूषा मुथा यांच्याविषयी पदाधिकारी व नगरसेवकांमध्ये नाराजी वाढली असून, त्यांना पुन्हा शासनाकडे पाठविण्याची मागणी सभेत नगरसेवकांकडून होण्याची शक्यता आहे.
उपायुक्त मुथा या कोणत्याही संचिकेवर निर्णय घेत नाहीत, अशा नगरसेवकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे सर्वसाधारण सभेत त्यांना परत पाठविण्याचा प्रस्ताव नगरसेवकांकडून मांडला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.  दोन महिन्यांपासून शहरात पाणी प्रश्न पेटलेला आहे. शहराला तीन दिवसांआड समान पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन मनपाने दिले. ते आश्वासन हवेत विरले आहे. पालिका नियमित पाणीपुरवठा करण्यात असक्षम ठरते आहे. त्यामुळे सभेत नगरसेवक पाणी प्रश्नावरून आक्रमक झाली.

Leave a comment

0.0/5