Skip to content Skip to footer

१५ दिवसात शेतकऱ्यांना पैसे द्या, बँका आणि विमा कंपन्यांना शिवसेनेचा इशारा

शेतकऱ्यांची पीक विमा कंपन्यांकडून होणारी अडवणूक थांबवण्यासाठी शिवसेनेचा आज मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल येथे मोर्चा निघाला होता. हा मोर्चा स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पार पडला. मोर्चाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकऱ्यांनी तुफान गर्दी केली होती. मोर्चाची सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भाषणाने झाली. यावेळी शेतकऱ्यांच्या पीकविमा आणि कर्जमाफीची प्रकरणं बँका आणि विमा कंपन्यांनी येत्या १५ दिवसात निकाली काढावी असा इशारा त्यांनी दिला. तसे न झाल्यास सोळाव्या दिवशी हा मोर्चा आक्रमक स्वरूप घेईल असं उद्धव ठाकरे म्हणाले. सोबतच या मोर्चाला नौटंकी म्हणणारे नालायक आहेत असा घणाघात त्यांनी विरोधकांवर केला.

पीक विमा कंपन्या आणि बँका सरकारने दिलेली रक्कम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू देत नाहीत. आज महाराष्ट्रातील लाखो शेतकरी कर्जमाफी आणि पीक विम्याच्या लाभापासून वंचित आहेत. शेतकऱ्यांचा पैसा तुम्हाला द्यावाच लागेल. येत्या १५ दिवसात बँकांनी कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांची यादी बँकेच्या बाहेर लावावी असं उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात नमूद केलं. मोर्चावर टीका करणारे विरोधक शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत की त्यांना लुटणाऱ्यांच्या बाजूने असा सवालही त्यांनी विरोधकांना केला आहे. मुंबई महाराष्ट्राला मिळू देणार नाही अशा गुर्मीत राहणाऱ्या काँग्रेस सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरून मुंबई महाराष्ट्रात आणण्यात शेतकऱ्यांचं मोलाचं योगदान आहे. ज्याचं शेतकऱ्यांनी पिकवलेलं आपण खातो त्यांना न्याय देण्यासाठी हा मोर्चा आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.

महिलांची लक्षणीय उपस्थिती

शिवसेनेच्या या मोर्चाला महिलांची उपस्थितीत सुद्धा लक्षणीय होती. ऊन,पाऊस यांची पर्वा न करता छत्र्या घेऊन मोठ्या प्रमाणावर महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

राज्यभरातून शेतकरी उपस्थित

पीक विमा कंपन्यांनी अडवणूक केल्याने हैराण झालेल्या शेतकऱ्यांनी शिवसेनेच्या या मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. राज्यभरातून शेतकरी या मोर्चासाठी मुंबईत आले होते. शेतकऱ्यांना अडचणी आल्यास मुंबईला येऊन कंपनीशी संपर्क करावा लागतो. हे टाळण्यासाठी विमा कंपन्यांनी राज्यात त्यांची कार्यालयं काढावीत अशी मागणीही शिवसेनेने केली आहे.

शिवसेनेचा पीक विमा मोर्चा सरकारविरोधात नाही,तो कशासाठी आहे वाचा:

Leave a comment

0.0/5