Skip to content Skip to footer

बलात्काऱ्यांना भर चौकात फाशी द्या-आदित्य यांचा ठाकरी बाणा

धुळे येथील जय हिंद महाविद्यालयात काल जन आशीर्वाद यात्रेअंतर्गत “आदित्य संवाद” कार्यक्रम पार पडला. यावेळी आदित्य ठाकरेंनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. थेट आदित्य ठाकरेंशी संवाद साधता येणार असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी उत्साहात दिसले. सकाळपासूनच त्यांनी महाविद्यालयातील कार्यक्रमस्थळी गर्दी केली होती. कार्यक्रमासाठी महाविद्यालय सजवण्यात आलं होतं.

सकाळपासूनच विविध गीत-संगीत हे परिसरात वातावर्निर्मिती करत होतं. या कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी आदित्य ठाकरे यांना उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारले. आदित्य ठाकरेंनीही या प्रश्नांची उत्तरे देत विद्यार्थ्यांची मनं जिंकली. ज्या विद्यार्थ्यांनी काही विशेष अपेक्षा व्यक्त केल्या अथवा सूचना दिल्या त्यांचं म्हणणं आदित्य ठाकरेंनी लिहून घेण्यास सांगतलं. शिवाय अशा विद्यार्थ्यांचं जाहीर कौतुक त्यांनी केलं.

कार्यक्रमास विद्यार्थ्यांची गर्दी होती. महाविद्यालयाच्या इमारतीच्या मजल्यांवर पॅसेजमध्ये सुद्धा विद्यार्थी कार्यक्रम ऐकण्यासाठी व आदित्य ठाकरेंना पाहण्यासाठी उभे असल्याचं चित्र पाहायला मिळालं. कार्यक्रम ऐन रंगात आला असताना एका विद्यार्थिनीने ठाकरे यांना “आज जे बलात्कार होतात त्यातील गुन्हेगारांना तत्काळ शिक्षा का होत नाही?” असा प्रश्न विचारला. यावर क्षणाचाही विलंब न करता आदित्य ठाकरेंनी “जर तो खरोखर रेपिस्ट असेल तर त्याला भरचौकात फाशी द्या” असं ठाकरी भाषेतील उत्तर दिलं.

यावेळी प्रश्न विचारण्याच्या विद्यार्थीनेनेही समाधान व आनंदाने उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या आणि कार्यक्रमस्थळी टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. शिवाय या उत्तरावर उपस्थितांनी जल्लोष करत आदित्य ठाकरेंना दाद दिली.

1 Comment

  • Dnyan dev kadam
    Posted July 21, 2019 at 7:37 am

    Hi

Leave a comment

0.0/5