Skip to content Skip to footer

छातीत राम आहे तर बडवता कशाला, सामनातून चंद्रकांत पाटलांना टोला

छातीत राम आहे तर बडवता कशाला, सामनातून चंद्रकांत पाटलांना टोला

                  सध्या महाराष्ट्रात आणि देशात राम मंदिरावरून राजकारण चांगलेच तापलेले दिसून येत आहे. मागच्या दोनच दिवसापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्या येथे राम जन्मभूमीला भेट दिली होती. तसेच पक्षाच्या ट्रस्टकडून १ कोटीची देणगी सुद्धा राम मंदिराच्या उभारणीला देण्याचे घोषित केले होते. त्यांच्या या दौऱ्यानंतर भाजपा नेत्यांनी शिवसेनेवर टीकेचा भडिमार केला होता. याच टीकेचा समाचार शिवसेनेच्या मुखपत्र सामानातून घेण्यात आलेला आहे.

            “भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या त्यांची छाती फाडण्याची गरज नाही. त्यांच्या छातीत हिंदुत्वाच्या बाबतीत किती काळेकुट्ट विष ठासून भरले आहे. याचा अनुभव १०० दिवसांपूर्वी महाराष्ट्राने घेतला, अशी टीका ‘सामना’च्या अग्रलेखातून चंद्रकांत पाटलांवर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अग्रलेखात चंद्रकांत पाटलांचा उल्लेख “चांदमियां पाटील” असा करण्यात आला आहे.

             उद्धव ठाकरे यांची अयोध्या यात्रा यशस्वीपणे पार पडली. त्यामुळे महाराष्ट्रातील उठवळ विरोधकांचे पोटविकार बळावल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यांनी ठाकरे सरकारच्या अयोध्या यात्रेवर टीका-टिप्पणी सुरु केली. त्यात त्यांचेच तोंडात लपवलेले राक्षसी सुळे जनतेला दिसत आहेत. उद्धव ठाकरे हे अयोध्येस गेले, ते तिथे प्रथम गेले काय? राज्यात फडणवीसांचे आणि केंद्रात पंतप्रधान मोदींचे सरकार असताना उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचा मोठा फौजफाटा घेऊन अयोध्येस जाऊन आले. दर्शन घेतले होते तसेच शरयूच्या तीरी त्यावेळी भव्य महाआरती केली होती. तोपर्यंत ठाकरे हे हिंदुत्ववादी होते,” असा टोलाही सामनातून लगावण्यात आला आहे.

              आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते अयोध्येस गेले. तिथे सरकारी मानवंदना स्वीकारली. म्हणजे त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि हजारो शिवसैनिकांसह रामलल्लांचे दर्शन घेतले. मात्र आता महाराष्ट्रातील भाजपवाल्यांना हे ढोंग वाटत आहे. शिवसेनेचे हिंदुत्व एखाद्याला ढोंग वाटणे हेच खरं तर ढोंग आहे. तसेच ढोंग राज्यातील भाजपवाले करती आहे. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन केले. सरकारमधील पक्षांच्या विचारधारा वेगळ्या असतीलही, पण लोकांना अन्न, वस्त्र, निवारा देणे, सगळ्यांना समान न्याय देणे हा मानवता धर्म म्हणजेच राजधर्म आहे,” असेही सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

Leave a comment

0.0/5