स्वतः कोरोनाशी यशस्वी झुंज देणाऱ्या आरोग्यसेविका सुवर्णा पाटील यांना ‘कोरोना रणरागिणी पुरस्कार’
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने सुरू असलेल्या उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे जोखमीचे काम करणाऱ्या वडाळ्याच्या आरोग्यसेविका श्रीमती सुवर्णा पाटील यांचा ‘कोरोना रणरागिणी’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. कोरोना संकटात उल्लेखनीय कार्य केलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यासाठी खासदार राहुल शेवाळे आणि ‘श्री राधा फाऊंडेशन’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमा अंतर्गत, श्रीमती पाटील यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला.
यावेळी खासदार शेवाळे, ‘श्री राधा फाऊंडेशन’च्या अध्यक्षा सौ. कामिनी राहुल शेवाळे, नगरसेवक अमेय घोले, उपविभागप्रमुख माधुरी मांजरेकर यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध वैद्यकीय योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे महत्वाचे कार्य गेल्या ८ वर्षांपासून आरोग्य सेविका श्रीमती सुवर्णा पाटील करत आहेत. पोलिओ, डेंग्यू, मलेरिया या आणि अशा अनेक आजारांपासून जनतेला वाचविण्यासाठी लसीकरण, नियमित तपासण्या, औषधांचे वाटप अशी विविध कामे आरोग्यसेविका वर्षभर करत असतात.
कोरोनाच्या जनजागृतीसाठी घरोघरी जाणे, लक्षणे आढळणाऱ्या संशयितांचे समुपदेशन करून त्यांना पालिकेच्या आरोग्य केंद्रात पाठविणे, कोरोनाबधितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मानसिक आधार देणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी औषधांचे घरोघरी वितरण करणे अशा अनेक पातळ्यांवर आरोग्यसेविका सुवर्णा पाटील यांनी वडाळा परिसरात भरीव कार्य केले आहे. अविरतपणे आपले कर्तव्य बजावणाऱ्या सुवर्णा यांनाही कोरोनाने गाठले होते. मात्र, त्यांनी धैर्याने त्या परिस्थितीला सामोरे जात कोरोनावर मात केली आणि पुन्हा एकदा त्यांनी कामाला सुरुवातही केली.
नवरात्र उत्सवात आत्तापर्यंत समाजसेविका श्रीमती पद्मा कपूर, आरोग्य सेविका श्रीमती मंगला जगताप, राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या पोलीस अधिकारी श्रीमती शालिनी शर्मा, वैद्यकीय कर्मचारी श्रीमती पद्मा जोसेफ यांचा सत्कार खासदार शेवाळे आणि ‘श्री राधा फाऊंडेशन’च्या वतीने करण्यात आला आहे.