Skip to content Skip to footer

नागपूर मनपात भाजपचा पराभव करण्यासाठी शिवसेनेची तयारी सुरू.

नागपूर मनपात भाजपचा पराभव करण्यासाठी शिवसेनेची तयारी सुरू

२०२२ मध्ये होणाऱ्या नागपूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला रोखण्यासाठी शिवसेनेने आतापासूनच पक्षबांधणीला नागपूर मध्ये सुरुवात केली आहे. नागपूर जिल्ह्यासाठी शिवसेनेनं नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नावं जाहीर केली आहेत. यात नागपूर सहसंपर्क प्रमुखपदी शेख सावरबांधे आणि सतिश हरडेंची नियुक्ती करण्यात आली आहे. तर व्यावसायिक प्रमोद मानमोडे यांची प्रभारी महानगरप्रमुख म्हणून वर्णी लावण्यात आली आहे. मात्र शिवसेनेचे माजी खासदार प्रकाश जाधव यांना यातून बाजूला करण्यात आले आहे.

 

सध्या नागपूर महानगरपालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आहे. २०२२च्या सुरुवातीला नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. नागपूर महापालिकेच्या राजकारणात सध्या काँग्रेस आणि भाजपा हेच दोन प्रमुख पक्ष आहे. पण गेल्या काही दिवसांपासून नागपुरात शिवसेना चांगलीच सक्रीय झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती जाहीर केली आहेत.

 

त्यानुसार नागपूर महानगरातील प्रभारी महानगप्रमुखपदी व्यावसायिक प्रमोद मानमोडे तर नागपूर दक्षिण आणि दक्षिण-पश्चिमच्या महानगर संघटकपदी मंगेश काशीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर नागपूर पश्चिम आणि मध्यसाठी महानगर संघटक म्हणून किशोर पराते, नागपूर उत्तर आणि पूर्वसाठी विशाल बरबटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर नागपूर मध्य, दक्षिण आणि दक्षिण पश्चिम या भागातील शहरप्रमुख म्हणून दीपक कापसे तर नागपूर उत्तर, पूर्व आणि पश्चिमसाठी नितीन तिवारी यांची वर्णी लागली आहे.

Leave a comment

0.0/5