भाजपा आमदार प्रशांत बंब यांच्यावर फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल?

ads

भाजपा आमदार प्रशांत बंब यांच्यावर फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल?

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर मतदारसंघाचे भाजपा आमदार प्रशांत बंब यांच्यावर बनावट दस्तऐवज खरा असल्याचे भासवून गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांची १५ कोटी ७५ लाख ३३ हजार ३३८ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात बंब यांच्यासह १६ जण आरोपी आहेत.

कृष्णा पाटील डोणगावकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून गंगापूर पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला असून, बनावट ठराव घेऊन कारखान्याचे चेअरमन, आमदार बंब आणि प्रभारी कार्यकारी संचालक बी.एम. पाटील यांनी गंगापूर सहकारी साखर कारखाना भागीदारीमध्ये दाखवल्याचे डोणगावकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

२००७-०८ पासून गंगापूर सहकारी साखर कारखाना बंद आहे. राज्य सहकारी बँकेने थकीत कर्जवसुलीसाठी हा कारखाना विक्रीला काढला. राज्य सहकारी बँकेच्या या कारवाईविरोधात संचालक मंडळाने न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी कारखान्याने न्यायालयात ९ कोटी रुपये जमा केले होते. जमा केलेली ही रक्कम न्यायालयाने कारखान्याला परत केली असून, व्याजासह ही रक्कम १५ कोटी ७५ लाख ३३ हजार ३३८ रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे.

कारखान्याचे चेअरमन व भाजपा आमदार प्रशांत बंब आणि प्रभारी कार्यकारी संचालक बी.एम. पाटील यांनी संगनमताने बँकेत खाते उघडण्यासाठी बनावट ठराव घेतला आणि हा कारखाना बंब आणि पाटील यांची पार्टनरशिप फर्म असल्याचे दाखवले. हा बनावट दस्ताऐवज खरा असल्याचे भासवले, असे डोणगावकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून गंगापूर पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा बंब यांच्यासह १६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here