Skip to content Skip to footer

विकासप्रकल्प पूर्ण करताना वेळेत पूर्ण करा, मुख्यमंत्री ठाकरे यांचे आदेश

पुणे आणि नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत सुरु असलेल्या विविध विकास कामाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय निवास्थानी बैठक आयोजित करण्यात आली होती. विकासप्रकल्प पूण करताना कालबद्ध मर्यादेतच पूर्ण करावा, जेणेकरून नागरिकांना त्याचा लाभ होईल असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणामार्फत ९६० कोटी रुपयांचा शिलकीचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. एकूण निधीपैकी सुमारे ५३ टक्के निधी मेट्रोसाठी खर्च करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. प्राधिकरणाच्या हद्दीतील प्रकल्पांसाठी लागणाऱ्या जमिनींचे मूल्यांकन करण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला होता.

तसेच नागपूर महानगर विकास प्राधिकरणाच्या कामांचे सादरीकरण महानगर आयुक्त शीतल उगले यांनी केले. आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी बांधण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. सध्या प्राधिकरणामार्फत सुमारे १५०० कोटी रुपयांचे विकास प्रकल्प सुरु आहे असे सुद्धा सांगण्यात आले.

या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह यावेळी उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5