Skip to content Skip to footer

पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला जोरदार धक्का, सांगलीत भाजपा नेत्यांनी केला शिवसेनेत प्रवेश

येणाऱ्या ग्रामपंचायत आणि महानगर पालिका निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाने कंबर कसली आहे. तसेच शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाप्रमुखांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यातच सांगली जिल्हयात शिवसेनेने भाजपाला जोरदार धक्का दिला आहे. भाजपच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

भाजपचे माजी सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब शिंदे, सावर्डे गावचे लोकनियुक्त सरपंच प्रदीप माने पाटील, तासगावचे माजी नगराध्यक्ष अविनाश पाटील, तासगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती कवठे एकंद गावचे जयवंत माळी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला पाहिजे, त्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. सर्वाधिक ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहेत. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना त्यांनी पूर्ण ताकद लावण्यास सांगितले.

Leave a comment

0.0/5