चिपी विमानतळाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी सोमवारी आमदार नितेश राणे यांनी ट्विटरच्या माद्यमातून केली होती. “सन्माननीय नारायण राणे साहेब हे मा. बाळासाहेबांचे सर्वात कडवट शिवसैनिक होते. चिपी विमानतळ हे खा. राणे साहेबांचा Dream Project आहे.. म्हणून या विमानतळाला “स्व. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे विमानतळ” हे नाव दिले पाहिजे, असे माझे वैयक्तिक मत आहे!! असे ट्विट त्यांनी केले होते. आता त्यांच्या या मागणीवर शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी राणे यांना टोला लगावला आहे.
गद्दार राणेंना बाळासाहेब ठाकरे यांचे नावही घेण्याचा अधिकार नाही, असे बोलत असताना विमानतळाच्या नामकरणाची चिंता नितेश राणे यांनी करू नये, त्यासाठी शिवसेना पक्ष सक्षम आहे, असे वैभव नाईक यांनी ठणकावून सांगितले.
पुढे बोलताना नाईक म्हणालेत की, राणे यांची राजकीय अस्तित्वासाठी केविलवाणी धडपड सुरू आहे म्हणून केवळ श्रेय घ्यायला राणे पुढे सरसावले आहेत. मात्र, सिंधुदुर्गवासीय राणेंना ओळखून आहेत. राणे शिवसेना संपवायला निघाले होते पण, शिवसैनिकांनी त्यांचे सर्व हल्ले परतवून लावले आणि पुन्हा जिल्ह्यात शिवसेना फोफावली, असेही आमदार वैभव नाईक म्हणाले. नाईक यांच्या या टीकेवर नितेश यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.