Skip to content Skip to footer

राज्यात मास्क न वापरणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाही, मुख्यत्र्यांचे निर्देश

ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या दुसऱ्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रसार अतिशय वेगाने होत असल्याचे त्यांच्या निष्कर्षावरून स्पष्ट होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहतानाच चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, मास्कचा वापर बंधनकारक करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्ह्याचे पोलीस अधिकारी यांच्याशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यात आतापर्यंत सर्वच यंत्रणांनी खूप मेहनत घेतली आहे. आता दुसऱ्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर गाफील राहून चालणार नाही. अधिक मेहनत घ्यावी लागेल. ऑक्सीजन, व्हेंटिलेटर्स, औषधे यांचा पुरेसा साठा करून ठेवावा, अलगीकरण-विलगीकरणाच्या सुविधा सज्ज ठेवाव्यात. हा विषाणू ज्या वेगाने पसरतो त्या प्रमाणात उपचारांची आणि चाचण्यांची क्षमता ठेवावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

स्थानिक पातळीवर कोरोना विषाणूमध्ये जनुकीय बदल होतात का याचा अभ्यास टास्क फोर्समधील डॉक्टरांनी करावा. नवीन प्रकारच्या कोरोना विषाणूमुळे उपचाराची पद्धत याबाबत टास्कफोर्सने अभ्यास करावा, असे ठाकरे यांनी सांगितले. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत सहव्याधी (कोमॉरबिड) असलेल्या लोकांचा राज्यभरातील डेटा (माहिती) आरोग्य विभागाकडे आहे. स्थानिक आरोग्य यंत्रणेने अशा सहव्याधी रुग्णांशी संपर्क करावा, त्यांच्याशी संवाद साधून त्यांची आरोग्यविषयक काळजी घेतानाच त्यांना सतर्क करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.

Leave a comment

0.0/5