भाजपा आमदार राम सातपुते यांचे विविह सोहळा दोन दिवसांपूर्वी पार पडला होता. मात्र आता सातपुते यांचा विवाह सोहळा चौकशीच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. त्यांच्या लग्नात कोरोनाच्या पाश्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले होते. तसेच कोणीही मास्क न लावताच लग्न सभारंभात वावरताना दिसून आले होते.
याच पाश्वभूमीवर आता आमदार राम सातपुते यांच्या लग्न सोहळ्याची चौकशी होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. राम सातपुते यांच्या लग्न सोहळ्यात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर आणि निलेश राणे यांच्यासह भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
आमदार राम सातपुते यांच्या लग्न सोहळ्यात कोरोना नियमावलीचे उल्लंघन झाले असल्याची माहिती आहे. त्यामुळे अलंकार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीवन जगदाळे यांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्याकडून याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सहपोलिस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी दिली आहे.
पुण्यातील शुभारंभ लॉन्समध्ये आमदार राम सातपुते यांचा विवाहसोहळा पार पडला. मात्र सातपुतेंच्या लग्नात पाहुण्यांची अलोट गर्दी लोटल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला. लग्न सोहळ्यातील फोटोमध्ये अनेक पाहुणे आणि नेते मंडळींनी तोंडाला मास्क लावला नसल्याचं पाहायला मिळालं. मोठ्या संख्येने गर्दी असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचाही बोजवारा उडाल्याचं दिसून आलं.