Skip to content Skip to footer

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट मधून कोविशील्ड लसीची पहिली खेप रवाना

संपूर्ण जगभरात हौदोस घालणाऱ्या कोरोना साथीच्या आजारावरील लसीकरणास भारतात येत्या १६ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या लसीकरणासाठी संपूर्ण देशभरात जय्यत तयारी करण्यात आली असून या संदर्भातील माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

आज कोविड लसीचे डोस पुण्यातील ‘सीरम’ इन्स्टिट्यूटमधून रवाना झाले. लस असलेले कंटेनर कडेकोट पोलीस बंदोबस्तात विमानतळावर गेले असून तेथून ही लस ठिकठिकाणी पाठवण्यास सुरुवात झाली आहे.

आज पहाटे साडेचारच्या सुमारास सीरम इन्स्टिट्यूटमधून ‘कोव्हिशील्ड’चे डोस घेऊन तीन कंटेनर बाहेर पडले. त्यापूर्वी, नारळ फोडून कंटेनरची पूजा करण्यात आली. पुणे परिमंडळ ५ च्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांना हा मान मिळाला. हार, फुले वाहून कंटेनरची पूजा करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी ‘गणपती बाप्पा मोरया’ अशा घोषणा सुद्धा दिल्या होत्या.

‘कोव्हिशील्ड’चे हे कंटेनर विमानतळावर पोहोचले असून तिथून ते निश्चित स्थळी पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुणे विमानतळ प्रशासनानं त्याबाबतचे व्हिडिओ ट्विटरवर शेअर केले आहेत. पुण्यातून कोव्हिशिल्ड लस देशातील १३ शहरांत पाठवण्यात येणार आहे.

Leave a comment

0.0/5