मुंबई पोलीस अधिकारी राकेश गवळी यांचा पतंगाच्या मांजाने गळा चिरला

मुंबईत पतंगाच्या मांजाने उडणाऱ्या पक्षांना मोठ्या प्रमाणात इजा झाल्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहे. तसेच पक्षांना या धार-धार मांजामुळे आपला प्राणही गमवावा लागलेला आहे. त्यात आता मुंबईच्या एका पोलीस अधिकाऱ्याचा गळा मांजामुळे चिरल्याची घटना समोर आली आहे. मुंबईच्या वरळी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश गवळी असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.

वरळी पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश गवळी आपल्या दुचाकीवरून सेशन कोर्टात जात होते. मात्र जे. जे जंक्शन येथे पोहचताच अचानक एक मांजा राकेश गवळी यांच्या गळ्यात अडकला आणि त्यांचा गळा चिरला गेला. तेथे उपस्थित असलेल्या ट्रॅफिक हवालदार शिंदे यांनी तात्काळ याची माहिती वरिष्ठांना दिली आणि जवळ असलेल्या जेजे रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.

परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त परमजीत सिंह दहिया यांनी तात्काळ उपचार व्हावे यासाठी गवळी यांना वोकहार्ट रुग्णालयात दाखल करून घेतले आणि प्लास्टिक सर्जन बोलवून तात्काळ उपचार सुरू केले. राकेश गवळी यांच्यावर शस्त्रक्रिया करून त्यांचे प्राण वाचवण्यात आले. राकेश गवळी अगदी थोडक्यात बचावले असून त्यांच्या गळ्याला १० टाके पडले असून त्यांचा आवाज ही थोडक्यात बचावला आहे अशी माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here