Skip to content Skip to footer

शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली हायजॅक करण्यासाठी ३०० पाकिस्तानी ट्विटर हॅण्डल, दिल्ली पोलिसांचा दावा

केंद्राने पारित केलेल्या कृषी कायद्याविरोधात मागच्या एक महिन्यांपासून शेतकरी दिलीत आंदोलन करत आहे. त्यात येत्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकरी संघटनेकडून ट्रॅक्टर रैलीचे आयोजन करण्यात आले आहे.
कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर रॅली काढण्यास पोलिसांनी सशर्त परवानगी दिली असून पाकिस्तानातून ३०० ट्विटर हॅण्डल कार्यान्वित झाली असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनाचे संचलन संपल्यानंतर कडक बंदोबस्तात ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती दिल्लीचे विशेष पोलिस आयुक्त दीपेंद्र पाठक यांनी पत्रकार माध्यमांना दिली आहे.

लोकांची दिशाभूल करून ट्रॅक्टर रॅली हायजॅक करण्यासाठी १३ जानेवारी ते १८ जानेवारी दरम्यान पाकिस्तानातून ३०८ ट्विटर हॅण्डल कार्यान्वित करण्यात आली आहेत. विविध गुप्तचर यंत्रणांकडून ही माहिती मिळाली आहे. आमच्यासाठी हे मोठे आवाहन असणार आहे. तरीही प्रजासत्ताक दिनाचे संचलन संपल्यानंतर कडक सुरक्षा व्यवस्थेत शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे, असे पाठक म्हणाले.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला सशर्त परवानगी दिली आहे. या रॅलीसाठी अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. शेतकरी दिल्लीत प्रवेश करू शकतील मात्र प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात कोणताही अडथळा आणणार नाहीत. प्रजासत्ताक दिनाचे संचलन संपल्यावर दुपारनंतरच ट्रॅक्टर रॅली काढता येईल. निश्चित केलेल्या मार्गांवरच ही ट्रॅक्टर रॅली निघेल.

Leave a comment

0.0/5