पाटणा : लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला धक्का देत महाआघाडीतून अचानक बाहेर पडत नितीश कुमार यांनी भाजपच्या पाठिंब्यावर पुन्हा एकदा म्हणजेच सहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
बिहारची राजधानी पाटणा येथील राजभवनात पार पडलेल्या शपथविधी समारंभात नितीश कुमार यांच्या पाठोपाठ त्यांचे आतापर्यंतचे कट्टर प्रतिस्पर्धी विरोधक सुशीलकुमार मोदी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली हे या समारंभाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले. बिहारच्या राजकारणात रंगलेल्या लालू विरुद्ध नितीशकुमार या संघर्षाला बुधवारी सायंकाळी निर्णायक वळण मिळाले. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या ‘अंतरात्म्याचा आवाज’ ऐकत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने मोठा राजकीय भूकंप झाला.
महाआघाडी तुटल्यानंतर वेगाने चक्रे फिरली व भारतीय जनता पक्षाने नितीशकुमार यांना बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे भाजपच्या पाठिंब्यावरील नवे सरकार सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज (गुरुवार) सकाळी दहा वाजता नितीशकुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांच्या निवासस्थानी रात्री उशिरा झालेल्या भाजप आमदारांच्या बैठकीमध्ये नितीशकुमार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. राजभवनाला तसे पत्र पाठविण्यात आले. संयुक्त जनता दलालाही याची पूर्वकल्पना देण्यात आली होती. नितीशकुमार यांनी मध्यरात्री राज्यपालांची भेट घेऊन भाजपच्या पाठिंब्यावर सरकार स्थापनेचा दावा केला.