Skip to content Skip to footer

आजच्याच दिवशी ‘सिंदरी’ येथे सुरू झाला होता स्वतंत्र भारताचा पहिला खत कारखाना

महाराष्ट्र बुलेटिन : स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सिंदरीमध्ये खत निर्मिती सुरू करून देशात हरित क्रांतीची पायाभरणी केली. धान्य उत्पादन वाढविण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल होते. याआधी ब्रिटीश राजवटीदरम्यान देशात सन १९३४ मध्ये बंगालमध्ये मोठा दुष्काळ पडला होता, त्यानंतर अन्नधान्य उत्पादन वाढवण्याच्या योजना आखल्या गेल्या, पण त्याची सुरुवात २ मार्च १९५१ रोजी झाली.

जरी सामान्य लोकांसाठी सिंदरी हे नाव नवीन असेल, परंतु कृषी संबंधित लोकांसाठी हे एक सुप्रसिद्ध असे नाव आहे. झारखंडच्या धनबाद येथे असलेल्या या औद्योगिक शहरामध्ये फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCIL) नावाचे खत तयार होत होते. येथे आजच्याच दिवशी, तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी सिंदरी खत कारखान्याचे उद्घाटन करून अमोनियम सल्फेट नावाचे रासायनिक खत शेतकऱ्यांच्या नावे केले होते, ज्यामुळे शेती व शेती संबंधित कामांना वेग आला.

बंगालमधील दुष्काळ हे सिंदरीमध्ये खत निर्मिती सुरू करण्यामागील प्रमुख कारण होते. असे म्हटले जाते की त्या काळात कोट्यवधी लोकांनी आपला जीव गमावला, तर बरेच लोक उध्वस्त झाले. तेव्हा ब्रिटीश राजवटीत दुष्काळाच्या कारणांचा शोध घेताना असे समोर आले की देशातील अन्नधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी आधुनिक शेती करणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतीची उपकरणे सुधारण्याबरोबरच खत बनवण्यावरही भर देण्यात आला.

सिंदरी खत कारखान्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर लिहिलेल्या सागा ऑफ सिंदरी या पुस्तकानुसार तेव्हा खत तयार करण्यासाठी कोळसा आणि पाण्याची उपलब्धता आवश्यक होती. सिंदरीमध्ये दामोदर नदीचे पाणी होते आणि त्यालगतच असलेल्या झरिया परिसरात कोळशाचा साठा होता. हे लक्षात घेता सिंदरीमध्ये खत प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

हा निर्णय सन १९४० मध्ये घेण्यात आला, परंतु तेव्हाच देशातील स्वातंत्र्यलढ्याला तीव्रता मिळाली आणि या काळात खत कारखाना बांधण्याच्या योजनेची गती मंदावली. अखेर स्वतंत्र भारतात पंडित नेहरूंनी या कारखान्याचे उद्घाटन केले. त्यासोबतच त्यांनी असेही म्हटले की देशात असे अनेक कारखाने उभे करण्यात येतील. तथापि, परिस्थिती अनुकूल असूनही असे होऊ शकले नाही.

३१ डिसेंबर २००२ रोजी सिंदरीचा खताचा कारखाना बंद झाला. तेव्हा कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व्हीएसएस अंतर्गत सेवानिवृत्त करण्यात आले होते, ज्यांची संख्या २००० पेक्षाही जास्त होती. याचे कारण असे देण्यात आले की या प्रकल्पातून विशेष असा फायदा मिळत नाही. जरी याचा परिणाम बर्‍याच लोकांच्या जीवनावर झाला आणि दरवर्षी हा दिवस जवळ येताच कारखान्याशी संबंधित लोकांना त्रास होईल, परंतु हे देखील नाकारता येणार नाही की हा कारखाना हरित क्रांतीच्या दिशेने भारताने टाकलेले खूप मोठे पाऊल होते.

Leave a comment

0.0/5