Skip to content Skip to footer

संजय राऊत यांचं मोठं विधान, म्हणाले- मोदींशी स्पर्धा करण्यासाठी शरद पवार हेच योग्य उमेदवार

महाराष्ट्र बुलेटिन : शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुकाबला करण्यासाठी विरोधकांकडे कोणताही चेहरा नाही आणि जोपर्यंत विरोधकांकडे चेहरा नाही तोपर्यंत कोणतीही संधी नाही असे राऊत यांनी म्हटले आहे. तथापि संजय राऊत यांनी म्हटले की २०२४ च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्यासाठी एखादा मोठा चेहरा असणे आवश्यक आहे आणि यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच उत्तम उमेदवार आहेत असे त्यांनी सांगितले.

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर संजय राऊत म्हणाले की, राहुल गांधी हे कॉंग्रेसचे मोठे नेते आहेत, परंतु अद्यापही त्यांच्यापेक्षा मोठे नेते उपस्थित आहेत. संजय राऊत म्हणाले की, कॉंग्रेसमध्ये नेतृत्वाबाबत संकट आहे, त्यामुळे पक्षाध्यक्ष अद्याप निवडले गेले नाहीत. दुसरीकडे, विरोधी एकतेसाठी कठोर परिश्रम घेत असलेले प्रशांत किशोर यांच्याबाबत संजय राऊत म्हणाले की, प्रशांत किशोर यांनी बंगालमध्ये चांगली कामगिरी केली आहे. असे टीएमसीचे म्हणणे आहे. टीएमसी आणि प्रशांत किशोर यांच्यात एक ॲग्रीमेंट देखील झाले होते. संजय राऊत म्हणाले की प्रशांत किशोर यांनी महाराष्ट्रात काम केले होते, आमच्याबरोबर देखील त्यांनी काही काम केले होते.

राऊत म्हणाले की, त्यांना काय करायचे आहे हे मला ठाऊक नाही. देशाच्या विरोधी पक्षांना ते एकत्र आणण्यात हातभार लाऊ शकतात. जर राजकीय पार्श्वभूमी नसलेला व्यक्ती असे काही करत असेल तर प्रत्येकजण त्यास मान्यता देत असतो. ते म्हणाले की, मोदींचा चेहरा महत्त्वाचा आहे. दुसर्‍या लाटेनंतर मोदींच्या लोकप्रियतेत थोडीशी घट झाली आहे, परंतु ते देशातील सर्वात मोठे नेते आहेत हे विसरून चालणार नाही.

मंगळवारी प्रशांत किशोर यांनी कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊतांनी हे वक्तव्य केले. यापूर्वी प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांच्या अनेक भेटी घेतल्या आहेत. प्रशांत किशोर यांच्या सक्रियतेकडे नरेंद्र मोदींच्या विरोधात विरोधी पक्षांमध्ये एकता निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.

Leave a comment

0.0/5