महाराष्ट्र बुलेटिन : महाराष्ट्र एसएससी निकाल उद्या १६ जुलै २०२१ रोजी दुपारी १:०० वाजता जाहीर होणार आहे अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. दहावीचे सुमारे १५ लाख विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दहावीचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर mahahsscboard.in जाहीर करण्यात येईल. निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीचे विद्यार्थी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आपला निकाल तपासू शकतात.
यावर्षीची १० वीची परीक्षा वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचा विचार करुन रद्द करण्यात आली होती. मात्र, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापन पद्धती जाहीर करण्यात आली होती.
दरम्यान दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन हे अंतर्गत गुणांच्या साहाय्याने करण्यात आले असून १०० गुणांच्या मूल्यमापनामध्ये ५० गुण हे विद्यार्थ्यांच्या नववीच्या गुणांच्या साहाय्याने तर उरलेले ५० गुण हे दहावीच्या मूल्यमापनावर आधारित असणार आहेत. याव्यतिरिक्त जर विद्यार्थ्यांना मिळालेले गुण हे समाधानकारक वाटत नसतील तर कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर त्यांना पुन्हा परीक्षा देता येणार आहेत.