महाराष्ट्र बुलेटिन : राज्यात अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक जिल्ह्यांना याचा फटका बसला आहे. त्यात प्रामुख्याने कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये पूरपरिस्थिती उद्भवल्याने काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जीवित तसेच, वित्तहानी झाली आहे. सदर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून तब्बल ११ हजार ५०० कोटींच्या पॅकेजला मंजुरी दिली आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीमध्ये मदत व पुनर्वसन विभागाने पुरग्रस्तांच्या झालेल्या नुकसानीचे सादरीकरण केले. या सर्व गोष्टींचा विचार करून सदर निर्णय घेण्यात आला अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
राज्याच्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीने, महापुराने आणि दरड कोसळून काही लोकांचे मृत्यू झाले आहेत. या घटना अत्यंत दुःखद असून आपत्तीग्रस्त लोकांसह शेती, रस्ते, घरे, एमएसईबीच्या झालेल्या नुकसानीसाठी महाराष्ट्र सरकारकडून दीर्घकालीन योजना करण्यात आली आहे. यासाठी ११ हजार ५०० कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे, अशी देखील माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे.