Skip to content Skip to footer

आर्ची नेमकी कुठेय?; रिंकूच्या कुटुंबीयांनी ‘त्या’ वृत्तावर केला खुलासा

रिंकू छुमंतर चित्रपटाच्या शुटिंगमध्ये आहे व्यस्त

करोनाच्या प्रसाराचा वेग कमी झाल्यानं सर्वच गोष्टी धिम्या गतीने सुरू केल्या जात आहेत. चित्रपटांचं शुटिंगही सुरू झालं आहे. मात्र, करोनाचा नवा प्रकार आढळून आल्यानंतर ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला. लॉकडाउन लागल्यामुळे अनेक कलाकार लंडनमध्ये अडकले आहेत. यात सैराटमधील आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरूही अडकल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र, रिंकूच्या कुटुंबीयांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे.

आगामी चित्रपटाच्या शुटिंगसाठी लंडनमध्ये गेलेली रिंकू तिथेच अडकल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यावर रिंकूच्या कुटुंबीयांनी खुलासा केला आहे. “ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांना बंदी घालण्यात आल्यामुळे माझी मुलगी (अभिनेत्री रिंकू राजगुरू) लंडनमध्ये अडकल्याचं वृत्त माध्यमातून दिलं जात आहे. हे खरं आहे की, रिंकू तिच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगसाठी लंडनला गेलेली होती. मात्र, महिनाभरापूर्वीच ती घरी परतली आहे. सध्या रिंकू पुण्यात आहे,” अशी माहिती रिंकूचे वडील महादेव राजगुरू यांनी दिली.

रिंकूच्या सचिवांनीही याबद्दल माहिती दिली आहे. रिंकू शुटिंगसाठी लंडनला गेली होती. मात्र, त्यानंतर काही दिवसातच ती परत आली. रिंकूने तिच्या चाहत्यांना इन्स्टाग्रामवर पोस्ट करूनही ही माहिती दिली. आपण लंडनवरून परतल्याचं आणि तब्येतही चांगली असल्याचं रिंकू पोस्टमध्ये म्हटलं होतं,” अशी माहिती त्यांनी दिली. सैराट सिनेमातून पडद्यावर पदार्पण करणारी रिंकू सध्या घराघरात पोहोचली आहे. रिंकू सध्या तिच्या आगामी ‘छुमंतर’ सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन समीर जोशी करत असून, या चित्रपटात रिंकूसोबत प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी, रिषी सक्सेना आणि बालकलाकार श्रीनिवास पोकळेदेखील आहेत. या चित्रपटाचं लंडनमध्येही शुटिंग करण्यात आलं आहे.

Leave a comment

0.0/5