Skip to content Skip to footer

अभिषेक बच्चनच्या ‘द बिग बुल’ चा टीझर प्रदर्शित, अखेर चाहत्यांसमोर आली रिलीज डेट

महाराष्ट्र बुलेटिन : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा चित्रपट ‘द बिग बुल’ चा टीझर आज प्रदर्शित झाला आहे. यासह चाहत्यांची प्रतीक्षाही संपली आहे, कारण टीझरमध्ये चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे. अभिषेक या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असून ‘द बिग बुल’ हा चित्रपट १९९२ साली झालेल्या भारतीय शेअर बाजाराच्या सर्वात मोठ्या घोटाळ्यातील आरोपी हर्षद मेहतावर आधारित आहे.

अभिषेक बच्चनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचा टीझर व्हिडिओ शेअर केला आहे. टीझरची सुरूवात अभिनेता अजय देवगनच्या आवाजाने झाली आहे. व्हिडिओमध्ये १९८७ च्या काळातील मुंबई दर्शविली गेली आहे आणि त्यानंतर अभिषेक बच्चनची एंट्री होते. बॅकग्राउंडला अजय देवगनच्या आवाजात ऐकू येते की ‘छोटे घरों में पैदा होने वालों को अक्सर बड़े सपनों को देखने से दुनिया मना कर देती हैं. इसलिए उसने अपनी ही दुनिया खड़ी कर दी, द बिग बुल.’ या चित्रपटाचा ट्रेलर १९ मार्च रोजी चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

अभिषेक बच्चन स्टारर फिल्म ‘द बिग बुल’ चे टीझर पाहून तुम्हाला त्याचा ‘गुरु’ हा चित्रपट आठवेल. या चित्रपटात एका अशा माणसाची कथा दाखवण्यात आली आहे, ज्याने भारताला स्वप्ने विकली. हा चित्रपट ८ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. यापूर्वी हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होणार होता पण कोरोना साथीच्या आजारामुळे चित्रपटाला पुढे ढकलण्यात आले.

अभिषेक बच्चनचा ‘बिग बुल’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ‘द बिग बुल’ हा एक क्राईम ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण आणि आनंद पंडित यांनी केली असून या चित्रपटाचे दिग्दर्शन कुकी गुलाटीने केले आहे. १९९२ मध्ये भारतीय शेअर बाजाराच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या घोटाळ्यावर आधारित हा चित्रपट असल्याचे बोलले जात आहे. अभिषेकने सोबतच सुजॉय घोषचा चित्रपट ‘बॉब बिस्वास’ च्या तयारीला ही सुरुवात केली आहे. यात तो चित्रांगदा सिंह आणि अमर उपाध्याय सोबत दिसणार आहे.

Leave a comment

0.0/5