Skip to content Skip to footer

लग्नात मासिक पाळी आल्याचं सांगितलं नाही म्हणून नवऱ्याने मागितला घटस्फोट

पत्नीने लग्नाच्या दिवशी पाळी आल्याचे न सांगून माझा आणि माझ्या आईचा विश्वास घात केला आहे

जगभरात महिला आणि कार्यकर्ते मासिक पाळीविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, समाजाच्या मानसिकेतत फरक पडत नसल्याचंच चित्र आहे. याची प्रचिती देणारी घटना गुजरातमध्ये घडली आहे. एका व्यक्तीने मासिक पाळी आल्याचं न सांगितल्याने पत्नीकडे घटस्फोटाची मागणी केली आहे. लग्नाच्या दिवशी मासिक पाळी आलेली होती, मात्र त्याविषयी माहिती दिली नाही म्हणून आरोपीने घटस्फोट मागितला आहे.

पत्नीने लग्नाच्या दिवशी पाळी आल्याचे न सांगून माझा आणि माझ्या आईचा विश्वास घात केला आहे, असा आरोप वडोदरा येथे राहणाऱ्या व्यक्तीने केला आहे. लग्नाचा विधी पत्नीने मासिक पाळी असताना केला. त्यानंतर मंदिरात जाण्याची वेळ आली, तेव्हा पत्नीने मासिक पाळीविषयी सांगितले, असं पतीने घटस्फोटासाठी दाखल केलेल्या याचिकेमध्ये म्हटलं आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात या जोडप्याचा विवाह सोहळा पार पडला होता. पती एका खासगी कंपनीत काम करतो, तर त्याची पत्नी शिक्षिका आहे.

याचिका दाखल करणाऱ्या व्यक्तीचा मोठा भाऊ घर खर्चासाठी पैसे देत असल्याने तुम्हाला पैसे देण्याची गरज नाही, असं पत्नीने सांगितले असल्याचे त्यानं म्हटले आहे. तसेच पत्नीने दर महिन्याला ५ हजार मागितले असल्याचेही त्याने सांगितलं. घरात एसी न लावल्याने आई वडिलांसोबत भांडण करून पत्नी माहेरी निघून गेल्याची माहिती त्याने दिली. त्यानंतर अनेक वेळा पत्नीला घरी आणण्याचा प्रयत्न केला. मात्र सतत पत्नी माहेरी निघून जात असल्याचा आरोप त्याने केला आहे. दरम्यान, पत्नीने छतावरून उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचा दावा पतीने केला आहे. त्यानंतर आपण घाबरल्याने तिची समजूत काढली, असं पतीने सांगितले. पत्नीने पतीच्या कुटुंबीयांविरोधात बापोड पोलीस ठाण्यात खोटी तक्रार दिली असल्याचे त्यानं म्हटले आहे.

Leave a comment

0.0/5