Skip to content Skip to footer

चिनी उत्पादनांवर 25 टक्के शुल्क

वॉशिंग्टन (एएफपी) : चीनमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या 200 अब्ज डॉलरच्या चिनी उत्पादनांवर 25 टक्के शुल्क आकारण्याच्या प्रस्तावावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विचार करीत आहेत. याआधी चिनी उत्पादनांवर 10 टक्के शुल्क आकारण्याची घोषणा करण्यात आली होती. या नव्या जादा शुल्काच्या प्रस्तावामुळे व्यापारी युद्ध आणखी भडकण्याची चिन्हे आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने 34 अब्ज डॉलरच्या चिनी उत्पादनांवर 25 टक्के शुल्क आकारले आहे. आता आणखी 16 अब्ज डॉलरच्या चिनी उत्पादनांवर जादा शुल्क आकारण्याची योजना आहे. ट्रम्प यांनी सुरवातीला 200 अब्ज डॉलरच्या चिनी उत्पादनांवर 10 टक्के शुल्क आकारण्याची घोषणा केली होती. आता हे शुल्क 25 टक्‍क्‍यांवर नेण्याचा विचार अमेरिका सरकारकडून सुरू आहे. यामुळे अमेरिकेकडून चीनवर व्यापारी संबंध समतोल करण्यासाठी दबाव वाढल्याचे दिसत आहे.

याविषयी बोलताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग म्हणाले, “व्यापारी संबंधांतील तणाव वाढविणारे निर्णय अमेरिका घेत आहे. यामुळे परिस्थिती आणखी बिघडत आहे. अमेरिकेला उत्तर म्हणून चीन आपल्या हित व हक्कांचे रक्षण करण्यासाठी ठोस पावले उचलेल.”

अमेरिकेची चीनसोबतच्या व्यापारातील तूट 2017 मध्ये 376 अब्ज डॉलर होती. ही व्यापारी तूट कमी करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक धोरण स्वीकारले आहे. अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व चिनी उत्पादनांवर दंडात्मक शुल्क लादण्याचा इशारा ट्रम्प यांनी नुकताच दिला होता. गेल्या वर्षी चीनची अमेरिकेला निर्यात 500 अब्ज डॉलरपेक्षा अधिक होती. चीनकडूनही अमेरिकेच्या उत्पादनांवर जादा शुल्क आकारण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे.

अमेरिकेचे हे ब्लॅकमेल करण्याचे आणि दबाव टाकण्याचे धोरण चीनच्या बाबतीत अजिबात काम करणार नाही. आमच्या हित व हक्कांचे रक्षण करण्यासाठी आम्ही पावले उचलू.
– गेंग शुआंग, प्रवक्ते, परराष्ट्र मंत्रालय, चीन

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5